Jayant Patil on NCP State President Resignation
पुणे: पक्षाने मला सात वर्षे प्रदेशाध्यक्ष पदाची संधी दिली. त्यामुळे आता तरुण चेहऱ्याला संधी द्या, अशी मागणी पक्षाच्या २६ व्या वर्धापनदिन सोहळ्यात प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी करताच एकच हलकल्लोळ झाला. त्यावर राजीनाम्याची घाई करु नका, कार्यकर्त्यांची भावना लक्षात घेत हा निर्णय आपण सर्वानुमते घेऊ, अशी भूमिका पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी मांडली.
राष्ट्रवादी काँगेसचे दोन पक्षांत विभाजान झाल्यानंतर शरद पवार आणि अजित पवार यांच्या वतीने पुणे शहरात एकाच वेळी दोन वेगळे वर्धापनदिन सोहळे साजरे कऱण्यात आले. दोन्ही पक्षांच्या वतीने शक्तीप्रदर्शन पाहावयास मिळाले. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचा 26 वा वर्धापनदिन सोहळा पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिरात झाला. यावेळी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी गहिवरलेल्या स्वरात मागणी केली की, मला पक्षाने सात वर्षे प्रदेशाध्यक्ष पदावर काम करण्याची संधी दिली. मला या जबाबदारीतून मुक्त करावे, नव्या चेहऱ्याला संधी द्या. यावर सभागृहात कार्यकर्ते जागेवर उभे राहून राजीनामा देऊ नका, साहेब तुम्हीच या पदावर रहा, असे ओरडून सांगू लागले. त्या वेळी पुन्हा जयंत पाटील कार्यकर्त्यांना म्हणाले, पक्ष शरद पवार साहेबांचा आहे. त्यांना निर्णय घेऊ द्या. तो मला मान्य राहील. त्यानंतर कार्यकर्ते शांत झाले.
या मेळाव्यात सर्वात शेवटी पक्षाध्यक्ष शरद पवार भाषणासाठी उभे राहिले. त्यांनी जयंत पाटील यांच्या मागणीचा उल्लेख सुरुवातीलाच केला. ते म्हणाले, कार्यकर्त्यांची भावना मला दिसली. तुम्ही पद सोडू नये, अशी त्यांची मागणी दिसत आहे. त्यामुळे घाईने निर्णय घेऊ नका, हा निर्णय आपण सर्वानुमते घेऊ.
हाच धागा पकडून पक्षाच्या कार्याध्यक्षा व खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या की, आपल्या पक्षात लोकशाही आहे. आठही खासदार, आमदार आणि कार्यकर्त्यांच्या भावनांचा विचार केला जाईल. आपण लोकशाही मार्गाने हा निर्णय घेऊ.
- मी राजीनामा देणार नव्हतो नव्या पिढीचे लोक आले पाहिजेत त्यासाठी साहेबांनी योग्य तो निर्णय घ्यावा त्यावर साहेब निर्णय घेतील.
- मी मराठीत भाषण केलं आहे. आता मागे कशाला जाता इथून पुढे पहा.
मी सात वर्ष काम करतोय साहेबांना वेगळा निर्णय घ्यायची मुभा दिली पाहिजे. त्यांना मोकळीक दिली पाहिजे, त्या बाबतीत ते सर्वांशी चर्चा करून योग्य तो निर्णय घेतील.
- मी अज्ञातवासात कधीच नव्हतो मी ज्ञात वासातच आहे. सर्वांना मी कुठे आहे. ते माहीत असते. साहेबांना सगळे अधिकार आहेत. अधिकार देणारा मी कोण साहेब यावर योग्य तो निर्णय घेतील.
- दोन राष्ट्रवादी एकत्र येतील की नाही हे मला माहीत नाही.
- मला असे वाटलं की आता सगळे एकत्रित गोळा झाले आहेत तेव्हा आपण ही इच्छा व्यक्त करावी. शेवटी पवार साहेब म्हणतील तेच अंतिम असते. तेव्हा साहेब जे ठरवतील ते पुढे चालू राहील. नवीन तरुणांना संधी द्यायची त्यावर पक्ष विचार करेल.