

पुणे: राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या महाविकास आघाडीतील तीनही पक्ष एकत्रित येऊन लढणार आहोत, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी दिली. शिवसेना उद्धव ठाकरे गटाबरोबर मनसेही एकत्रित येणार असेल तर महाविकास आघाडीत त्यांचे स्वागत आहे. तसेच, दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यावर कोणतीही चर्चा होत नसून केवळ प्रसारमाध्यमांनीच तसे वातावरण तयार केल्याचेही ते म्हणाले.
मांजरीतील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या (व्हीएसआय) संचालक मंडाळाच्या बैठकीनिमित्त सोमवारी (दि.9) ते आले असता सकाळी पत्रकारांशी बोलत होते. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा आज मंगळवारी (दि.10) सकाळी 10 वाजता येथील बालगंधर्व रंगमंदिरात वर्धापन दिन कार्यक्रम आयोजित करण्यात आल्याचे त्यांनी सुरुवातीलाच स्पष्ट केले. (Latest Pune News)
गेल्या महिनाभरापासून अजित पवार गटातील नेते उत्स्फूर्तपणे दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र येण्यावर चर्चा करत असल्याबद्दल छेडले असता पाटील म्हणाले, यामध्ये कोणतीही चर्चा सुरू नाही. मला प्रसारमाध्यमांतून हा प्रश्न वारंवार का विचारला जातोय, हेच कळले नाही. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांनी एकत्र यावे, म्हणून सर्व प्रसारमाध्यमांनीच तीव्र इच्छा दाखवत तसे वातावरण तयार केल्याचे ते म्हणाले.
महाविकास आघाडीमध्ये जे पक्ष एकत्र येतील ते बरोबर घेऊन पुढे जाणारी महाविकास आघाडी आहे. त्यामध्ये कोणतीही अडचण वाटत नाही. शिवसेनेने जर मनसेला बरोबर घेऊन एकत्रित यायचे ठरविले तर महाविकास आघाडीची ताकद वाढविण्यासाठी त्यांचे स्वागत आहे. राज ठाकरे हे प्रभावी वक्ते आहेत, यात काही शंका नाही.
आघाडीची ताकद वाढत असेल तर का नाही? मात्र, मला चर्चा सुरू आहे किंवा नाही याबद्दल माहिती नाही. मात्र, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसप्रमाणेच म्हणजे उद्धव ठाकरे शिवसेना गट आणि राज ठाकरे यांचा मनसे पक्ष मुंबईत एकत्र येण्याची चर्चा सुरू आहे. त्यांनाही प्रसारमाध्यमांनी एकत्र केल्याचे दिसते. ते एकत्र येतील किंवा नाही याची मला कल्पना नाही. मी अज्ञातवासात गेल्याचे वृत्त एका वृत्तवाहिनीने रविवारी दाखविले.
आम्ही राज्यात पक्ष उभारणी, बांधणीचे काम करतोय. मागील विधानसभा निवडणुकीनंतर जे अनुभव आम्हाला आले त्यातून पक्ष सुधारण्याचा, बळकट करण्याचा प्रयत्न करतोय. मला खात्री आहे की, लग्नकार्ये आणि पाऊसपाणी हे कमी झाल्यावर आम्ही महाराष्ट्रात जास्त प्रमाणात फिरू, असेही त्यांनी सांगितले.