...अन् 110 कोटींच्या जागेची किंमत पोहचली 763 कोटींवर Pudhari
पुणे

Janata Vasahat TDR Scam: ...अन् 110 कोटींच्या जागेची किंमत पोहचली 763 कोटींवर

पार्क आरक्षणासाठी 5 हजार 720 रेडीरेकनर असताना 39 हजार 650 ने दर आकारणी

पुढारी वृत्तसेवा

पांडुरंग सांडभोर

पुणे: जनता वसाहतीच्या ‘झो.पु. हिल पार्क’चे आरक्षण असलेल्या जागेचा रेडीरेकनरचा दर 5 हजार 720 रुपये प्रति चौ. मी. इतका असताना ‘एसआरए’ने मात्र या जागेचे मूल्यांकन करून घेताना 39 हजार 650 प्रति चौ. मी. दराने संपूर्ण 48 एकर जागेचे मूल्यांकन करून घेतले. त्यामुळे या जागेची प्रत्यक्षात किंमत 110 कोटी इतकी होत असतानाही ती थेट 763 कोटींवर पोहचल्याची धक्कादायक बाब या वादग्रस्त टीडीआर प्रकरणात समोर आली आहे.

झोपडपट्ट्यांच्या जागी पुनर्विकासाच्या योजना राबवून गोरगरीब झोपडपट्टीधारकांना हक्काचे घर मिळवून देण्याच्या हेतूने एसआरए प्राधिकरणाची स्थापना झाली. मात्र, हेच एसआरए झोपडपट्टीधारकांचे नाही, तर बांधकाम व्यावसायिकांना आर्थिक फायदा मिळवून देण्यासाठी कसे काम करते, हे जनता वसाहत प्रकरणाने समोर आले आहे.  (Latest Pune News)

पर्वती येथील फायनल प्लॉट नं. 519, 521अ, 521 ब, (जुना. स. न. 105, 107, 108, 109) या मिळकतीवर असलेल्या झोपडपट्टीची खासगी जागा 2022 च्या नियमावलीनुसार ‘एसआरए’ने ताब्यात घेण्याचा प्रस्ताव मंजूर केला. त्यानुसार जागामालक मे. पर्वती लँड डेव्हलपर्स एलएलपी यांना टीडीआर स्वरूपात मोबदला देण्याच्या प्रस्तावास गृहनिर्माण विभागाने मंजुरीही दिली.

त्यानंतर एसआरएने या जागेचे खरेदीखत करण्यापूर्वी जागेचे मूल्यांकन काढण्यासाठी सह जिल्हा निबंधकांना पत्र पाठविले. त्यात त्यांनी संबंधित सर्व्हे नं. आणि त्यामध्ये असलेले एकूण जागेचे क्षेत्र याची माहिती देत झोपडपट्टी व्याप्तक्षेत्र असलेल्या या जागेचे वार्षिक मूल्य तक्त्यातील दर 39 हजार 650 प्रति चौ. मी. इतका असल्याचे स्पष्ट करीत त्यानुसार दस्ताची किंमत निश्चित करावी, असे कळविले. या दरानुसार सह जिल्हा निबंधकांनी झोपडपट्टी क्षेत्र असलेल्या या जागेचे शासकीय नियमानुसार जागेच्या एकूण किमतीच्या 40 टक्के इतकेच मूल्यांकन करीत दस्ताची किंमत निश्चित केली. त्यानुसार संबंधित रक्कम भरून ’एसआरए’ने या जागेचे खरेदीखत केले.

मात्र, ज्या सर्व्हे नं. 105, 107, 108, 109 यावर जनता वसाहत झोपडपट्टीची 48 एकर जागा आहे, त्या जागेचे वार्षिक मूल्यांकन तक्त्यात पर्वती पार्क हिल आरक्षणाचा प्रत्यक्षात रेडीरेकनर दर हा 5 हजार 720 रुपये प्रति चौ. मी. इतका आहे.

त्याकडे सोईस्कर काणाडोळा करीत आणि जागामालकांच्या घशात 763 कोटींचा टीडीआर घालून देण्यासाठी सिटी सर्व्हे नं. 661 चा रेडीरेकनर लावून घेण्यासाठी स्वत:हून सह जिल्हा निबंधकांना पत्र पाठविले. त्यामुळे त्या जागेची किंमत रेडीरेकनरनुसार 110 कोटींवरून थेट 763 कोटी इतकी फुगविली गेली. वास्तविक, पार्क आरक्षणाचा रेडीरेकनरचा असलेल्या 5 हजार 720 रुपये दराने मूल्यांकन करण्यासाठी ’एसआरए’ने पाठपुरावा करणे अपेक्षित असताना प्रत्यक्षात मात्र 39 हजारांचा रेडीरेकनर लावून घेण्यासाठी ’एसआरए’ने आटापिटा केल्याचे स्पष्ट होत आहे.

दस्ताची किंमत ठरविताना सिटी सर्व्हे नंबर, जुना सर्व्हे नंबर आणि फायनल प्लॉट यापैकी ज्यामध्ये सर्वांत रेडीरेनर ज्याचा असेल, तो दर घेऊन दस्ताची किंमत ठरविली जाते, तर जनता वसाहतीच्या जागेचा सिटी सर्व्हेनुसार रेडीरेकनर हा 39 हजार 650 इतका आहे. त्यानुसार दस्तांची किंमत निश्चित करण्यात आली. मात्र, जर पक्षकारांनी म्हणजेच एसआरएने याबाबत हरकत घेतली असती आणि संबंधित जागेवर असलेले पार्कचे आरक्षण आणि एसआरए पुनर्विकास योजनेसाठी ही जागा घेतली जात असल्याचे निदर्शनास आणून दिले असते, तर कमी असलेला दर लावण्याची कार्यवाही होऊ शकली असती. मात्र, ’एसआरए’ने कोणतीही हरकत घेतली नाही. त्यामुळे आमच्या नियमानुसार काही रेडीरेकनर लावला.
- संतोष हिंगाणे, सह जिल्हा निबंधक व मुद्रांक जिल्हाधिकारी. पुणे
सह जिल्हा निबंधक कार्यालयाकडून आलेल्या पत्रानुसार आम्ही जनता वसाहतीच्या जागेचे रेडीरेकनर लावण्यासंबंधीचे पत्र दिले. मात्र, त्यात चूक झाली. आता पुन्हा ‘एसआरए’मार्फत पार्क आरक्षणाचा रेडीरीन वाडकर, उपअधीक्षक, भूमिअभिलेख, एसआरए प्राधिकरण, पुणे
- नितीन वाडकर, उपअधीक्षक, भूमिअभिलेख, एसआरए प्राधिकरण, पुणे

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT