

पुणे: संततधार पावसामुळे मध्य रेल्वेच्या वाहतुकीचा चांगलाच बोजवारा उडाला. मंगळवारी (दि. 19) आणि बुधवारी (दि. 20) या दोन दिवशी पुणे-मुंबईदरम्यान धावणार्या सहा महत्त्वाच्या गाड्यांसह पुणेमार्गे धावणारी मुंबई-सुरत एक्स्प्रेस अशा एकूण सात रेल्वेगाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. यात डेक्कन क्वीन, सिंहगड, डेक्कन, इंद्रायणी, प्रगती आणि इंटरसिटी एक्स्प्रेसचा समावेश असणार आहे.
पुणेमार्गे मुंबईला जाणारी नागरकोईल एक्स्प्रेस, कोयना एक्स्प्रेस, उद्यान एक्स्प्रेस, कोईमतूरहून मुंबईला जाणार्या कोईमतूर एक्स्प्रेसलादेखील पुण्यातच शेवटचा थांबा घ्यावा लागला. त्यामुळे या सर्व गाड्यांच्या प्रवाशांना पुण्यातून मुंबईला जाण्यासाठी पर्यायी मार्ग शोधावे लागले. अनेकांनी बाय रोड जाण्यासाठी बसस्थानक गाठले. (Latest Pune News)
विलंब होण्याव्यतिरिक्त हवाई वाहतुकीवर परिणाम नाही!
पावसामुळे विमानोड्डाणांवर परिणाम होत असतो. मात्र, मंगळवारी नियोजित सर्व विमानोड्डाणे व्यवस्थित झाली. परंतु, काही विमानोड्डाणांना 25 ते 30 मिनिटांचा विलंब झाला. तसे पाहिले तर पावसाचा कोणताही मोठा परिणाम पुण्यातून होणार्या विमान वाहतुकीवर झाला नाही. कोणतीही नियोजित विमाने रद्द झाली नाहीत, अशी माहिती पुणे विमानतळाचे संचालक संतोष ढोके यांनी दिली.
मुंबईहून पुण्याला येणार्या गाड्यांना विलंब
मंगळवारी झालेल्या पावसामुळे मुंबईहून पुण्याला येणार्या आमच्या गाड्यांना उशीर झाला. नियोजित फेर्या रद्द झाल्या नाहीत. मात्र, मुंबईकडून पुणे विभागात येणार्या बहुतांश गाड्यांना उशीर होत होता, असे एसटीचे पुणे विभागीय वाहतूक अधिकारी कमलेश धनराळे यांनी सांगितले.