ITI Admission Pudhari
पुणे

ITI Admission 2026: संस्थास्तरीय समुपदेशन फेरीचे वेळापत्रक जाहीर; १२ ऑगस्टपासून प्रवेश प्रक्रिया

ऑगस्ट सत्रासाठी DVETची घोषणा; ६ ऑगस्टपासून अर्ज दुरुस्ती, ८ ऑगस्टला गुणवत्ता यादी

पुढारी वृत्तसेवा

पुणे: राज्यातील शासकीय व खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील (आयटीआय) शिल्प कारागीर प्रशिक्षण योजनेअंतर्गत ऑगस्ट २०२६ सत्राच्या प्रवेश प्रक्रियेतील संस्थास्तरीय समुपदेशन फेरीचे वेळापत्रक जाहीर झाले, अशी माहीती व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाचे संचालक सतीश सूर्यवंशी यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे दिली.

प्रवेश प्रक्रिया केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रणालीद्वारे https:/// admission.dvet.gov.in या संकेतस्थळावर राबविण्यात येत असून, पात्र उमेदवारांनी जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार आवश्यक कार्यवाही करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. संचालनालयाने दिलेल्या माहितीनुसार, नोंदणी केलेल्या मात्र अद्याप प्रवेश न मिळालेल्या उमेदवारांना ६ ते ७ ऑगस्टदरम्यान प्रवेश अर्जातील आवश्यक बदल किंवा हरकती नोंदविण्याची संधी देण्यात आली आहे. त्यानंतर ८ ऑगस्ट रोजी समुपदेशन फेरीसाठी एकत्रित गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात येणार असून, उमेदवारांना एसएमएसद्वारे ही माहिती दिली जाणार आहे.

समुपदेशन फेरीसाठी पात्र उमेदवारांनी ९ ते १० ऑगस्टदरम्यान आपल्या प्रवेश खात्यात लॉगिन करून संबंधित आयटीआय व व्यवसायासाठी नोंदणी करणे आवश्यक आहे. ११ ऑगस्टपर्यंत संस्थानिहाय गुणवत्ता यादी व समुपदेशनाची वेळ जाहीर केली जाईल. त्यानंतर १२ व १३ ऑगस्ट रोजी संबंधित संस्थांमध्ये प्रत्यक्ष समुपदेशन होऊन गुणवत्ता, उपलब्ध जागा व पात्रतेच्या आधारे प्रवेश निश्चित करण्यात येणार आहेत. याशिवाय १७ ते २२ ऑगस्टदरम्यान संस्थास्तरीय समुपदेशन फेरी क्रमांक २ ते ७ आयोजित करण्यात येणार आहे.

असे आहे वेळापत्रक

  • हरकती नोंदवणे / अर्जातील माहिती दुरुस्ती ६ ऑगस्ट स. ९ वा. ते ७ ऑगस्ट सायं. ५ वाजेपर्यंत

  • समुपदेशन फेरीसाठी एकत्रित गुणवत्ता यादी प्रसिद्ध ८ ऑगस्ट सायं. ५ वाजेपर्यंत

  • समुपदेशन फेरीसाठी नोंदणी ९ ऑगस्ट स. ९ वा. ते १० ऑगस्ट सांय ५ वाजेपर्यंत

  • संस्थानिहाय गुणवत्ता यादी व समुपदेशनाची तारीख/ वेळ जाहीर ११ ऑगस्ट सकाळी ११ पर्यंत

  • संस्थास्तरीय समुपदेशन फेरी व जागा वाटप १२ ऑगस्ट स.८ वा. ते १३ ऑगस्ट ५ वाजेपर्यंत

  • मूळ कागदपत्र पडताळणी व प्रत्यक्ष प्रवेश १२ ऑगस्ट स. ८ वा. ते १३ ऑगस्ट सांय ५ वाजेपर्यंत

संस्थास्तरीय समुपदेशन फेरी क्र. २ ते ७

  • उमेदवारांची प्रत्यक्ष हजेरी नोंदणी १७ ते २२ ऑगस्ट स. ८ वा. ते ११

  • संस्थानिहाय गुणवत्ता यादी प्रसिद्ध १७ ते २२ ऑगस्ट दररोज दुपारी १२ वा.

  • समुपदेशन व जागावाटप १७ ते २२ ऑगस्ट दुपारी १ पासून अंतिम उमेदवारापर्यंत

खासगी आयटीआय संस्थांमधील संस्थास्तरावरील प्रवेश

  • संस्था स्तरावरील व रिक्त जागांवरील प्रवेशप्रक्रिया १३ जुलै स. ९ ते २२ ऑगस्ट रात्री ११:५९ वाजेपर्यंत

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT