पुणे: माहिती-तंत्रज्ञानाच्या (आयटी) क्षेत्रात काम करणारा अजय हा गिटार वाजवायला शिकतोय तर सुप्रिया नृत्याचे धडे गिरवत आहे...वर्क फॉम होम किंवा नोकरीच्या व्यग््रा वेळापत्रकात अडकलेली आयटी क्षेत्रात काम करणारी तरुणाई आता आपल्यातील कलाकारीला वाव मिळावा म्हणून कलाशिक्षणाकडे वळली आहे. 22 ते 35 वयोगटातील तरुण-तरुणींमध्ये कलाशिक्षणाचा ट्रेंड वाढला आहे. गायन, वादनासह नृत्य, चित्रकला, अभिनय, छायाचित्रण, लेखन अशा विविध कलांचे शिक्षण घेण्याला तरुणाई प्राधान्य देत असून, आयटीतील तरुणाईत नृत्यकला शिक्षणाचा सर्वाधिक ट्रेंड आहे. सोमवारी (दि. 12) साजरी होणाऱ्या स्वामी विवेकानंद जयंती आणि राष्ट्रीय युवा दिनानिमित्त दै. ‘पुढारी’ने या ट्रेंडविषयी जाणून घेतले.
प्रत्येकात एक कलाकार दडलेला असतो, असे म्हणतात. त्यामुळेच आपल्यातील कलाकाराला वाट मिळावी, यासाठी तरुणाई कलेकडे वळली. चित्रकला, नाट्याभिनय, सुलेखन, लेखन, पाककला आणि भाषा शिक्षणाकडे आयटीतील तरुणाईचा कल आहे. कुणी ऑनलाइन तर कुणी प्रत्यक्ष कलावर्गात बसून धडे गिरवत आहे. शनिवारी आणि रविवारी दोन तास कला वर्ग होत असून, प्रशिक्षक आयटीतील तरुणांसाठी आर्वजून विकेंडला असे वर्ग घेत आहेत. सध्या गायन, वादन, चित्रकला, अभिनय, भाषा शिक्षण आणि पाककृती शिकण्याकडे आयटीतील तरुणांचा कल आहे. त्याशिवाय काहीजण लेखनाकडेही वळलेत. काहीजण मराठी, हिंदी लेखनासह मोडी लिपी शिकण्यासाठीही वेळ काढत आहेत.
आयटी कंपनीत काम करणारा राज देशपांडे म्हणाला, आयटी कंपनीत काम करताना कामाच्या व्यापामुळे स्वत:साठी वेळ देणे आणि आपली आवडती कला जोपसणे शक्य होत नाही. पण, मी वेळ काढून संवादिनी वादनाचे प्रशिक्षण घेत आहे. यातून मला एखादी कला शिकता येत असल्याचा आनंद मिळते. सांस्कृतिक कार्यक्रमांचे निवेदनही करत असल्याने लेखन, संवाद कौशल्य याचे प्रशिक्षण घेत आहे.
आयटीतील तरुण बनले व्लॉगर्स
सध्या आयटीतील तरुणाई वेळ काढून फेसबुक, इन्स्टाग््रााम आणि यु-ट्यूबवरील व्हिडिओ पाहून कला शिक्षण घेत आहे. वर्क फॉम होममुळे घरी असलेली 22 ते 35 वयोगटातील तरुणाई तर चक्क फुड, ट्रॅव्हल आणि फिटनेस व्लॉगिंगकडे वळली आहे. यु-ट्यूबवर अनेकांनी चॅनेल सुरू केले असून, त्या माध्यमातून ते वेगवेगळे व्हिडिओ अपलोड करत आहेत. या फुड, ट्रॅव्हल आणि फिटनेस व्हिडिओला चांगला प्रतिसाद आहे. त्यातून त्यांची आर्थिक कमाईही होत आहे.
आयटीतील तरुणाई प्रामुख्याने नृत्य शिक्षणाकडे वळली आहे. कामातील ताणतणाव दूर करण्यासाठी तरुण-तरुणी नृत्य शिक्षणावर भर देत आहेत. शास्त्रीय, बॉलीवूड, लोकनृत्य, पाश्चिमात्य नृत्याकडे त्यांचा कल आहे. आमच्या संस्थेत आयटी क्षेत्रात काम करणाऱ्या चार तरुणी नृत्याचे धडे गिरवत आहेत. नृत्यामुळे तरुणाईला त्यांची कलेची आवड जपता येत आहे. आज आयटी पार्क जिथे आहेत त्याच्या जवळ अनेक कलेशी संबंधित अनेक वर्ग सुरू आहेत. त्यांची संख्याही दिवसेंदिवस वाढत आहे.जतीन पांडे, नृत्य दिग्दर्शक