पुणे

पतसंस्थांनी स्पर्धेत टिकणे महत्त्वाचे : दिलीप वळसे पाटील

Laxman Dhenge

मंचर : पुढारी वृत्तसेवा : राष्ट्रीयीकृत बँका, सहकारी बँक यांच्या स्पर्धेत सहकारी पतसंस्था टिकणे ही काळाची गरज आहे. कारण सर्व सामान्य लोकांच्या गरजा तत्काळ पूर्ण करण्याचे काम पतसंस्था करत आहेत. कर्जदारांनी कर्ज घेतल्यानंतर त्याची नियमित परतफेड केल्यास संस्था खर्‍या अर्थाने सक्षम होणार आहे. कलम 101 अंतर्गत कारवाई करण्यासाठी संबंधित विभागाने तत्काळ वसुली दाखला देण्याबाबत सहकार खात्याने आदेश दिले असल्याचे सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सांगितले. शिवसेना उपनेते, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील संस्थापक,अध्यक्ष असलेल्या श्रीभैरवनाथ नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित लांडेवाडी, चिंचोडी (ता. आंबेगाव) या पतसंस्थेचा घाटकोपर, मुंबई येथे शाखा स्थलांतर सोहळा सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या हस्ते झाला. त्या वेळी ते बोलत होते.

या वेळी माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील ,भैरवनाथ पतसंस्थेचे उपाध्यक्ष सागर काजळे, संचालिका कल्पना आढळराव पाटील, डायनालॉग इंडिया लिमिटेड कार्यकारी संचालक अक्षय आढळराव पाटील, युवा उद्योजक अपूर्व आढळराव पाटील, भैरवनाथ पतसंस्था संचालक योगेश बाणखेले, हनुमंत तागड, शोभा आवटे, राम तोडकर, आबा लांडगे, भिकाजी बोकड, अशोक गव्हाणे,रामदास पवळे, स्वप्नील बेंडे,अमोल पडवळ, उद्योजक विठ्ठल मिंडे, माजी नगरसेवक संजय भालेराव,माजी नगरसेवक प्रतीक्षा घुगे,शाखा व्यवस्थापक संध्या कुलकर्णी व संस्थेचे सभासद, खातेदार उपस्थित होते.

केवळ नफा कमावणे हाच संस्थेचा उद्देश नसून संस्थेने सामाजिक बांधिलकी जपत लोकाभिमुख कार्याला हातभार लावला आहे.आपत्ती कोणतीही असो नैसर्गिक अथवा मानवनिर्मित भैरवनाथ पतसंस्था नेहमीचं लोकांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिली आहे. जनसेवेचा हा वसा अन वारसा या पुढील काळातही असाच जपला जाईल असे प्रतिपादन संस्थेचे संस्थापक,अध्यक्ष माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी यावेळी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे उपाध्यक्ष सागर काजळे यांनी केले. सूत्रसंचालन विभागीय अधिकारी संतोष पाचपुते यांनी केले. तर संचालक महेश ढमढेरे यांनी उपस्थित सर्वांचे आभार मानले.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT