नद्यांच्या पर्यावरणीय पुनरुज्जीवनासाठी विशेष मोहीम : 60 संस्था, संघटनांचा सहभाग | पुढारी

नद्यांच्या पर्यावरणीय पुनरुज्जीवनासाठी विशेष मोहीम : 60 संस्था, संघटनांचा सहभाग

पुणे : पुढारी वृत्तसेवा : नद्यांचे हक्क, माझी जबाबदारी पुणे जिल्ह्यातील भीमा खोल्यातील 7 नद्यांसाठी पुणे रिव्हर रिवायवल संस्थेच्या वतीने विशेष मोहीम आयोजित करण्यात आली आहे, अशी माहिती रिवायवल संस्थेचे सचिव संतोष ललवाणी, शैलजा देशपांडे आणि विवेक वेलणकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. या मोहिमेची सुरवात प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर दि 26 जानेवारी पासून करण्यात येणार आहे. पुण्यातील नद्यांच्या पर्यावरणीय पुनरुज्जीवनासाठी एकत्र आलेल्या 60 हून अधिक संस्था आणि व्यक्तींची संघटना पुणे नदी पुनरुजीवन (पीआरआर) भीमा खोऱ्यातील मुळा, मुठा, रामनदी, पवना, इंद्रायणी, भामा आणि भीमा या 7 नद्यांसाठी ‘राईट्स ऑफ रिव्हर्स “मोहीम सुरू करणार आहे. ही मोहीम 26 ते 28 जानेवारी पर्यंत 3 दिवसांसाठी आहे. प्रत्येक नदीवर ही मोहीम होणार आहे. पुण्यात बंडगार्डन गार्डन पूल येथे मोहिमेचे उद्घाटन सायंकाळी 4 वाजता तर समारोप सकाळी 11 वाजता होणार आहे.

जीवितनदी, एन. ए. पी. एम. जलबिरादरी, जलदिंडी प्रतिष्ठान, नमामी इंद्रायणी प्रतिष्ठान, श्री आळंदी धाम सेवा समिती, मनहर्व फाऊंडेशन, रंजाई, रोटरी क्लब ऑफ बाल्हेकरवाडी, निसर्गसेवक, सजग नागरिक मंच आणि इतर अनेक संस्थांद्वारे ही मोहीम एकत्रितपणे राबवली जाणार आहे. आंतरराष्ट्रीय नदी तज्ज्ञ परिणीता दांडेकर या मोहिमेचे उद्घाटन करणार आहेत. 28 जानेवारी रोजी होणाऱ्या समारोप सोहळ्याचे प्रमुख पाहुणे म्हणून वॉटरमैन ऑफ इंडिया राजेंद्र सिंग आणि आर, जे, संग्राम हे सन्माननीय अतिथी तरुणांशी संवाद साधतील.

सांडपाणी आणि प्रदूषणमुक्त अशा नैसर्गिक मुक्तपणे वाहणाऱ्या स्वच्छ नद्या निर्माण करण्यासाठी, लोकांमध्ये तसेच सरकारी संस्थांमध्ये जागरूकता निर्माण करणे हे या मोहिमेचे अंतिम उद्दिष्ट आहे. ज्या 7 नद्यांवर ही मोहीम राबवली जाणार आहे त्या सर्व ठिकाणी पाण्याचे नमुने गोळा केले जातील. नद्यांच्या हक्कांसाठी पुण्याच्या नागरिकांनी 700 दिवसांचे साखळी उपोषण पूर्ण केले आहे. त्यानिमित्त नदीकाठांवर विशिष्ट ठिकाणी 24 तास सामूहिक उपवास करण्यात येणार आहे. साखळी उपोषण चळवळीना पाठिंबा देण्यासाठी व्यक्ती आणि गटांकडून आंशिक उपवास करण्यात येणार आहे. साफसफाई, सेल्फी आणि ब्लॉग, पथनाट्ये किंवा इतर प्रकारची कला प्रदर्शने आदी युवकांना प्रोत्साहन देण्यासाठी ‘सेल्फी विथ द रिव्हर’ स्पर्धा आयोजित केली जाणार आहे.

हेही वाचा

Back to top button