हिंजवडीच्या आयटी कर्मचार्‍यांना मिळणार दिलासा; मेट्रोचे 70 टक्के काम पूर्ण Pudhari
पुणे

Pune Metro: हिंजवडीच्या आयटी कर्मचार्‍यांना मिळणार दिलासा; मेट्रोचे 70 टक्के काम पूर्ण

रोजच्या वाहतूक कोंडीपासून होणार सुटका; मार्च 2025 अखेर मेट्रो ट्रेन धावणार

प्रसाद जगताप

Pune Metro News: हिंजवडी ते शिवाजीनगरदरम्यान काम सुरू असलेल्या पुणेरी मेट्रोचे एकूण 70 टक्क्यांपेक्षा अधिक काम पूर्ण झाले असून, मार्च 2025 अखेर येथून मेट्रो ट्रेन धावणार आहे. त्यामुळे रोजच्या वाहतूक कोंडीने वैतागलेल्या आयटी आणि इतर कर्मचार्‍यांना लवकरच दिलासा मिळणार आहे.

हिंजवडी भागात पुण्यातील (Pune) सर्वाधिक मोठे औद्योगिक आणि आयटी क्षेत्र आहे. या भागात असंख्य कर्मचारी, अधिकारीवर्ग कामानिमित्त दररोज खासगी आणि कंपन्यांच्या वाहनाने (बस, कार) ये-जा करतात. मात्र, त्यांना दररोज येथील रस्त्यांवर वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. येथील कोंडीने कर्मचारी आणि स्थानिक रहिवासी अक्षरश: वैतागलेले आहेत.

त्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने येथील नागरिकांच्या सोयीसाठी मेट्रो सुरू करण्याचे काम सुरू आहे. गेल्या अनेक वर्षांपासून हे काम सुरू आहे. ते कधीपर्यंत पूर्ण होईल आणि आमची रोजच्या वाहतूक कोंडीतून कधी सुटका होईल, असे या भागातील स्थानिक रहिवासी, आयटियन्स आणि चाकरमान्यांना पडले आहेत.

रेल्वेट्रॅकच्या खाली अत्याधुनिक ‘थर्ड रेल सिस्टिम’चा वापर

पुणेरी मेट्रोकडून (Pune Metro)आता हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रोसाठी अत्याधुनिक थर्ड रेल सिस्टिमचा वापर करण्यात येणार आहे. या थर्ड रेल प्रणालीचा अवलंब केल्यामुळे हिंजवडी ते शिवाजीनगर या 23.3 किलोमीटरच्या मार्गावर मेट्रोला रुळांच्या शेजारून, खालून विद्युतपुरवठा केला जाईल. या संपूर्ण मार्गावर कुठेही ट्रेनच्या बाजूने किंवा डोक्यावर इलेक्ट्रिकच्या खांबांचे किंवा तारांचे जंजाळ दिसून येणार नाही.

पुणे आयटी सिटी मेट्रोमार्फत कामे

शिवाजीनगरच्या मध्यवर्ती केंद्राशी जोडणार्‍या पुणे मेट्रोलाइन 3 प्रकल्पाचे बांधकाम वेगाने पुढे सरकत आहे. हिंजवडी ते शिवाजीनगर मार्गावरील पुणे मेट्रोलाइन 3 चे काम पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणातर्फे (पीएमआरडीए) सार्वजनिक खासगी भागीदारी (पीपीपी) तत्त्वावर टाटा समूहाने हाती घेतले असून, त्याच्या कार्यान्वनासाठी पुणे आयटी सिटी मेट्रो रेल लिमिटेड या स्पेशल पर्पज व्हेईकल (एसपीव्ही) कंपनीची स्थापना करण्यात आली आहे. त्यामार्फत काम सुरू आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT