पुणे

पुरंदर उपसा जलसिंचनची गळती थांबेना; एअर व्हॉल्वमधून पाण्याची नासाडी

अमृता चौगुले

नायगाव : पुढारी वृत्तसेवा

पुरंदर उपसा जलसिंचन योजना शेतीसाठी फायदेशीर ठरत आहे. मात्र, एअर व्हॉल्वमधून वारंवार होणारी पाण्याची गळती योजनेसाठी डोकेदुखी ठरत आहे. योजना निरंतर चालू ठेवायची असेल, तर प्राधान्याने देखभाल दुरुस्ती होणे गरजेचे आहे; अन्यथा पुरंदर उपसा योजनेची पारगाव माळशिरस प्रादेशिक योजना होण्यास वेळ लागणार नाही, अशी प्रतिक्रिया या भागातील शेतकरी व्यक्त करीत आहेत.

ज्वारी, बाजरी, मटकी, हुलगा यापलीकडे उत्पन्नाचा स्रोत नसलेल्या पुरंदरच्या पूर्व भागात पुरंदर उपसा जलसिंचन योजनेमुळे आता हजारो एकरवर ऊस, कांदा, अंजीर, सीताफळ व फुलशेती बहरल्याचे पाहायला मिळत आहे. कुक्कुटपलान, दुग्धव्यवसायासारखे छोटे-मोठे शेतीपूरक व्यवसायही सुरू झाले आहेत. परिणामी, या भागातील सर्वसामान्य नागरिकांचे राहणीमान उंचावले आहे.

योजनेमुळे पालटले परिसरातील चित्र

योजना सुरू होण्यापूर्वी या भागातील महिलांना रोजंदारीसाठी दौंड तालुक्यातील यवत परिसरात जावे लागत होते. आता परिस्थिती बदलली आहे. शेतातील कामे उरकत नसल्याने दौंड तालुक्यातून महिला रोजंदारीसाठी पुरंदर उपसाच्या लाभक्षेत्रात येऊ लागल्या आहेत.

सद्यःस्थिती

  • पुरंदर उपसा योजनेच्या व्हॉल्वमधून अनेक ठिकाणी पाण्याची गळती सुरू आहे.
  • गळतीमुळे पाणी योग्य दाबाने न मिळणे, वेळेवर न पोहचणे, पाण्याचा अपव्यय होणे, पाणी चोरी आदी समस्या उभ्या राहिल्या आहेत.
  • पाणीगळती आणि चोरीला वेळीच आवर घातले, तरच होणारी पाण्याची नासाडी थांबेल.

…तर पुन्हा दुष्काळाचे चटके बसतील

देखभाल दुरुस्तीअभावी याच भागातील सोळा गावांना पिण्याचा पाणीपुरवठा करणारी पारगाव-माळशिरस प्रादेशिक योजना बंद पडली. त्यामुळे या गावातील नागरिकांना पिण्याच्या स्वच्छ पाण्यापासून दूर राहावे लागले. पुरंदर उपसा योजनेची दुखणी वेळीच दूर केली नाही, तर येथील शेतकर्‍यांना शेतीच्या पाण्यापासून वंचित राहावे लागण्याची शक्यता आहे. तसे झाल्यास या योजनेचे लाभक्षेत्र पूर्वीप्रमाणेच दुष्काळी होण्यास वेळ लागणार नाही.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT