Iran Israel Conflict Impact India: पश्चिम आशियात सुरू असलेल्या संघर्षाचे परिणाम आता दूरवर जाणवू लागले आहेत. इराण, इस्रायल आणि अमेरिकेमधील तणाव अधिक वाढला आहे. दोन्ही बाजूंनी हवाई हल्ले आणि प्रत्युत्तर सुरूच असून या संघर्षात आतापर्यंत मोठ्या प्रमाणावर जीवितहानी झाली आहे. उपलब्ध माहितीनुसार इराणमध्ये सर्वाधिक नुकसान झाले असून 1,400 हून अधिक लोकांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे.
या संघर्षाचा परिणाम केवळ मध्यपूर्वेपुरता मर्यादित राहिलेला नाही. जागतिक ऊर्जा बाजारावर त्याचे परिणाम दिसू लागले आहेत. इराण हा जगातील महत्त्वाच्या तेल उत्पादक देशांपैकी एक असल्याने युद्ध अधिक भडकले तर जागतिक तेलपुरवठ्यावर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. या जागतिक घडामोडींचे पडसाद भारतातही उमटू लागले आहेत.
महाराष्ट्रात विशेषतः पुण्यात व्यावसायिक गॅस पुरवठ्यावर तात्पुरता परिणाम झाल्याची माहिती समोर आली आहे. युद्धजन्य परिस्थितीमुळे पुरवठा व्यवस्थेवर दबाव येण्याची शक्यता लक्षात घेऊन व्यावसायिक वापरासाठी दिल्या जाणाऱ्या एलपीजी सिलेंडरचा पुरवठा तात्पुरता थांबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. घरगुती ग्राहकांना गॅसचा पुरवठा सुरळीत सुरू राहावा, यासाठी हा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे.
पुणे जिल्ह्यातील शिक्रापूर येथील भारत पेट्रोलियमच्या प्लांटमधून तसेच चाकण येथील हिंदुस्तान पेट्रोलियमच्या प्लांटमधून व्यावसायिक सिलेंडरचा पुरवठा सध्या थांबवण्यात आला आहे. याबाबत डीलर्सना स्पष्ट सूचना देण्यात आल्या असून पुढील आदेश मिळेपर्यंत कमर्शियल सिलेंडर उचलण्यासाठी वाहने पाठवू नयेत, असे सांगण्यात आले आहे.
या निर्णयाचा परिणाम मुख्यतः व्यावसायिक क्षेत्रावर होऊ शकतो. हॉटेल्स, कॅफे, रेस्टॉरंट्स, धाबे आणि केटरिंग सेवा देणाऱ्या व्यवसायांमध्ये मोठ्या प्रमाणावर कमर्शियल गॅस सिलेंडरचा वापर होतो. त्याचप्रमाणे बेकरी, मिठाई दुकाने, हॉस्पिटल्समधील कँटीन तसेच काही लघुउद्योग आणि कारखान्यांमध्येही या सिलेंडरचा वापर केला जातो. त्यामुळे पुरवठा थांबण्याचा परिणाम या क्षेत्रांवर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, या संघर्षामागील पार्श्वभूमीही महत्त्वाची मानली जाते. इस्रायलने अनेक वेळा इराणला त्याच्या अण्वस्त्र कार्यक्रम आणि क्षेपणास्त्र क्षमतांबाबत इशारे दिले होते. इस्रायलच्या मते, इराणकडून या क्षमतांचा विस्तार झाल्यास प्रदेशातील सुरक्षेला धोका निर्माण होऊ शकतो. मात्र इराणने हे आरोप फेटाळून लावत आपला कार्यक्रम सुरूच ठेवला. परिस्थिती अधिक तणावपूर्ण झाल्यानंतर इस्रायल आणि अमेरिकेने इराणची राजधानी तेहरान येथे हल्ले केल्याचे वृत्त समोर आले. त्यानंतर मध्यपूर्वेतील तणाव पुन्हा वाढला आहे.
तज्ञांच्या मते हा संघर्ष अधिक काळ चालल्यास त्याचे आर्थिक परिणाम जगभर जाणवू शकतात. विशेषतः ऊर्जा बाजार, पुरवठा साखळी आणि इंधनाच्या किमतींवर त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे. भारतासारख्या मोठ्या ऊर्जा आयात करणाऱ्या देशासाठी ही परिस्थिती चिंतेची ठरू शकते. सध्या परिस्थितीवर सर्वांचे लक्ष असून पुढील काही दिवसांत या संघर्षाची दिशा काय असणार, यावर जागतिक अर्थव्यवस्था आणि ऊर्जा बाजाराचे गणित अवलंबून आहे.