Iran US Israel Conflict Pudhari
पुणे

Iran US Israel Gulf Conflict: इराण-इस्रायल-अमेरिका संघर्षाचे जागतिक अर्थव्यवस्थेवर परिणाम

इराणच्या हल्ल्यामुळे अमेरिकेची मक्तेदारी आणि पेट्रोडॉलरवर दबाव; कच्च्या तेलाच्या व्यवहारावर परिणाम

पुढारी वृत्तसेवा

शैलेंद्र देवळाणकर, परराष्ट्र विश्लेषक

पुणे: इराण-इस्रायल-अमेरिका संघर्षात इराणने अमेरिकेच्या आखातातील लष्करी आणि हवाई तळांवर जबरदस्त प्रतिहल्ले करून अमेरिकेची मक्तेदारी मोडीत काढली आहे. त्यामुळे सध्याचा संघर्ष संपल्यानंतर अमेरिकेची पेट्रोडॉलर सिस्टिम उद्ध्वस्त होणार असून, अमेरिकेची आखातातील मक्तेदारी कमी होणार असून कच्च्या तेलांच्या व्यवहारांवर देखील परिणाम होणार असल्याचे संकेत मिळत आहेत. इराण-इस्रायल-अमेरिका हा संघर्ष कधी ना कधी थांबणार आहे.

परंतु, या संघर्षाचे नेमके काय परिणाम होतील, याचे संकेत आता मिळायला लागले आहेत. या संघर्षात इराणची धार्मिक राजवट टिकेल का नाही, इस्रायलबरोबरचे इराणचे संबंध कसे राहतील, इराणमध्ये लोकशाही प्रक्रियेतून शासन येईल की नाही, हे येणारा काळ सांगेल. परंतु, यातून काही स्पष्ट संकेत मिळत आहेत. या संघर्षातून जागतिक राजकारण नेमक्या कोणत्या दिशेने जाणार आहे आणि यातून नेमके कोणते बदल घडून येणार आहेत, याचे संकेत मिळायला लागले आहेत. या संघर्षात प्रत्यक्षपणे चीन आणि रशिया इराणच्या बाजूने उतरलेले नसले तरी अप्रत्यक्षपणे चीन आणि रशियाचे इराणला समर्थन आहे. इंटेलेजीन्स इनपुट, बॅलेस्टिक मिसाईल्स किंवा आर्थिक मदत इराणला संबंधित देशांनी केली असल्याचे दिसून येत आहे. यापुढे अमेरिकेचा आखातातील प्रभाव कमी होत जाणार आहे.

त्याचे कारण म्हणजे अमेरिकेचे आखातातील सात प्रमुख लष्करी आणि हवाई तळांवर इराणने केलेले जोरदार हल्ले आहेत. अमेरिकेची थाड, पॅट्रीयाटसारखी अत्याधुनिक हवाई संरक्षण प्रणाली भेदण्यात इराणला यश आले आहे. ३०० दशलक्ष डॉलर खर्च करून तयार करण्यात आलेली आणि जॉर्डनमध्ये तैनात असलेली थाड हवाई संरक्षण प्रणाली इराणने शाहीन १३६ या ड्रोनच्या माध्यमातून उद्ध्वस्त केली. त्याचप्रमाणे कतारमधील अमेरिकेचे बिलियन डॉलरचे रडार उद्ध्वस्त केले. अमेरिकेने जगात एकूण सहा थाड हवाई संरक्षण प्रणाली तैनात केल्या आहेत. जपान, साऊथ कोरीया आखातामध्ये सौदी अरेबीया, जॉर्डन आदी ठिकाणी थाड सिस्टिम तैनात केली आहे. यातील जॉर्डनमधील धाड सिस्टिम उद्ध्वस्त करण्यात आली आहे. त्यामुळे इराणने अमेरिकेच्या लष्करी पायाभूत सुविधा उद्ध्वस्त करण्यावर भर दिला असल्याचे स्पष्ट झाले आहे. अरब देशांवर हल्ले करून तुम्ही सुरक्षित नसल्याचा इशारा त्यांना दिला. तसेच,अमेरिकेने तुमच्या संरक्षणाची जबाबदारी घेतली असली तरी अमेरिका तुमचे संरक्षण करू शकत नाही, असे अरब देशांना दाखवून दिले. त्यामुळे यापुढील काळात अरब राष्ट्र अमेरिकेच्या लष्करी तसेच हवाई तळांना कितपत सहकार्य करतील, हे पाहावे लागणार आहे.

त्यामुळे या संघर्षाच्या माध्यमातून आखातामधील अमेरिकेची लष्करी आणि हवाई तळे कमकुवत झाल्याचे पाहायला मिळणार आहे. आखाती देशांमधील कच्च्या तेलांच्या रिफायनरीवर हल्ला करून आणि जगाला कच्च्या तेलाची वाहतूक करणाऱ्या स्ट्रेट ऑफ हार्मुजला बंद पाडून इराणने अमेरिकेच्या पेट्रोडॉलरवरच हल्ला केला आहे. एकीकडे आखातातील अमेरिकेचे महत्त्व कमी होणार असून, दुसरीकडे अमेरिकेच्या पेट्रोडॉलरचा प्रभाव देखील कमी होईल, हा या संघर्षाचा सर्वात मोठा परिणाम असणार आहे. जगात तीन प्रकारच्या कच्च्या तेलांची निर्मिती केली जाते. ओपेक देश कच्च्या तेलाची जी निर्मिती करतात, त्याला ब्रेंट क्रूड ऑईल म्हणतात. रशियाकडून जी तेलाची निर्मिती होते. त्याला उरॉल आईल म्हणातात, तर लॅटीन अमेरिकेकडून जी तेलाची निर्मिती होते. त्याला डब्ल्यूटीआय असे म्हणतात. या कच्च्या तेलांची खरेदी करत असताना ब्रिक्स देश डॉलरची मक्तेदारी कमी करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. त्यासाठी संबंधित देश त्यांच्या तिजोरीमधील परकीय गंगाजळीतील डॉलरचे प्रमाण कमी करून सोन्याचे प्रमाण वाढवत आहेत. तसेच, डॉलरशिवाय दुसऱ्या चलनात व्यवहार करण्याचे प्रयत्न करत आहेत. भारत रशियाकडून तेल रुपयांमध्ये घेणार आहे. चीन रशियाकडून तेल युवानमध्ये घेणार आहे. त्यामुळे जागतिक बाजारात सध्या अमेरिकेच्या डॉलरची असणारी मक्तेदारी कमी होण्यास मदत होईल.

पेट्रोडॉलर म्हणजे काय ?

जगात कच्च्या तेलाचा जो व्यवहार आहे, हा डॉलरमध्येच होईल, अशा प्रकारचा करार सौदी अरेबिया आणि अमेरिकेमध्ये १९७३ मध्ये झाला होता. त्यामुळे कच्च्या तेलाचे व्यवहार है केवळ डॉलरमध्ये होताना दिसतात. पूर्वी हे व्यवहार सोन्याच्या माध्यमातून केले जात होते. भारत आज आखातामधून जे कच्चे तेल आयात करतो ते डॉलरमध्येच घेतो, भारताने २०२५ मध्ये १३७ अब्ज डॉलरचे तेल आखातातून आयात केले आहे.

(शब्दांकन : गणेश खळदकर)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT