Iran Israel US War file photo
पुणे

Iran Israel US War: इराणचा अमेरिका-इस्रायलवर जोरदार प्रतिहल्ला; संघर्ष तिसऱ्या महायुद्धाकडे?

आयातुल्ला खामेनी यांच्या राजवटीवर प्रहाराचा प्रयत्न उलटला; आखातापासून युरोपपर्यंत तणाव वाढण्याची चिन्हे

पुढारी वृत्तसेवा

- डॉ. शैलेंद्र देवळाणकर,

परराष्ट्र विश्लेषक

पुणे : इराणमधून आयातुल्ला खामेनी यांची धार्मिक राजवट संपवण्यासाठी सरसावलेल्या अमेरिका आणि इस्रायलवर इराणने जोरदार प्रतिहल्ला चढवला आहे. त्याची व्याप्ती वाढली असून, किमान 13 ते 15 देशांवर इराण सध्या हल्ले करत आहे. इराणकडून सध्या सुरू असणारे हल्ले आणखी किती काळ चालतील, सध्या आखाती राष्ट्रांमध्येच सुरू असलेले हल्ले युरोपीय देशांवरदेखील होतील का, तसेच यामध्ये किती देश ओढले जाणार, यावरच या युद्धाचे भवितव्य अवलंबून आहे. परंतु, इराणच्या सामर्थ्याला ओळखण्यात अमेरिका आणि इस्रायलची मोठी चूक झाली असल्याचे स्पष्ट झाले आहे.

इराण, इस्रायल आणि अमेरिका यांच्यात आखातामध्ये सुरू असलेल्या युद्धाची व्याप्ती सध्या वाढत आहे. यामध्ये अनेक देश प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष ओढले जात आहेत. हे सगळे पाहता काही गोष्टींचे संकेत आता मिळायला लागले आहेत. त्यातील पहिला संकेत म्हणजे अमेरिका आणि इस्रायलने इराणच्या सामर्थ्याला दुर्लक्षित केले. त्यांनी याची कल्पनाही केली नाही की, इराण इतक्या प्रचंड ताकदीने प्रतिहल्ला करेल. इराण केवळ संबंधित दोन देशांवर हल्ला करणार नाही, तर तब्बल 14 देशांवर हल्ला करेल. ओमानपासून सायप्रसपर्यंत हा हल्ला असेल, सौदी अरेबिया, बहरीन, कतार, कुवेत या देशांवर हल्ला करेल. अमेरिकेच्या आखातातील लष्करी तळांवर हल्ला करून ते उद्ध्वस्त करू शकेल. तसेच, स्टेट ऑफ होर्मुज बंद करेल, याची या दोन देशांनी कल्पनादेखील केली नसेल.

इस्रायल आणि अमेरिका या दोन देशांना वाटले की, आयातुल्ला खामेनी यांचा खात्मा झाला की, इराणमधील धार्मिक राजवट कोसळेल. परंतु, तसे काहीही घडले नाही. उलट इराणपुरस्कृत हमास, हुती, हिजबुल्लाह आदी संघटनांनी आता जोरदार प्रतिहल्ला सुरू केला आहे. याची अमेरिकेला भणकदेखील लागली नाही, याचे आश्चर्य वाटत आहे. इराणने यापूर्वीच्या गल्फवॉरमध्येदेखील बंद केले नसलेले स्टेट ऑफ होर्मुज आता बंद केले असून, कच्चे तेल वाहून नेणारी जहाजे दिसल्यास ती उडवून टाकण्याची धमकी दिली आहे. त्यामुळे हा संघर्ष जगाला तिसऱ्या महायुद्धाकडे घेऊन जात असल्याचे संकेत मिळत आहेत.

संयुक्त राष्ट्रसंघ निष्प्रभ

1939 ते 1945 दरम्यान जगाने दुसऱ्या महायुद्धाचा सामना केला. या महायुद्धात प्रचंड जीवित, तसेच वित्तहानी झाली. याच महायुद्धात अणुबॉम्बचा वापर झाला. त्याचे विध्वंसक परिणाम जगाने पाहिले. त्यामुळे आता ज्यावेळी कधी चौथे महायुद्ध होईल ते दगडांनी होईल. याचा अर्थ पूर्ण मानवी संस्कृतीचा विनाश झालेला असेल. त्यामुळेच तिसरे महायुद्ध होऊ नये, यासाठी 1945 साली संयुक्त राष्ट्र संघटनेची निर्मिती झाली. याचा मुख्य उद्देशच हा होता की, राष्ट्रांच्या अनियंत्रित महत्त्वाकांक्षांना लगाम घालणे आणि जगात शांतता आणि सुरक्षितता निर्माण करणे होय. परंतु, आता मात्र संबंधित संघटना निष्प्रभ ठरताना दिसत आहे. कारण, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आंतरराष्ट्रीय कायद्यांचा कोणताही विचार न करता त्यांना हवे त्याप्रमाणे काम करत आहेत. व्हेनेझुुएलाचे अध्यक्ष मादुरो यांना ज्याप्रमाणे लष्करी कारवाई करून ताब्यात घेतले, त्यावरून जगातील एकाही देशाने हा आंतरराष्ट्रीय कायद्याचा भंग झाला आहे की नाही, असा अमेरिकेला जाब विचारला नाही. तसाच प्रकार इराणमध्ये झाला आहे. अमेरिकेचा इराणमधील लष्करी हस्तक्षेप हे आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन नाही का, असा प्रश्न कोणीही उपस्थित करत नाही.

इराणकडून जगातील जवळपास 13 देशांवर हल्ले सुरू आहेत. यामध्ये कोणतीही कमी होत नाही. प्रचंड ताकदीने हे हल्ले सुरू आहेत. यामध्ये कुवेतमध्ये ‌‘एफ 15‌’सारखे अत्याधुनिक लढाऊ विमान पडणे ही अमेरिकेसाठी नामुष्की आहे. आखातातील विविध देशांमध्ये असणाऱ्या लष्करी तळांचे संरक्षण करण्याची जबाबदारी अमेरिकेकडे होती. परंतु, त्यांच्याकडून ही जबाबदारी पार पाडली जात नाही. इराणने सायप्रसमध्ये हल्ला केला आहे. त्यामुळे पश्चिम युरोपीय देशांना या युद्धाची झळ बसली असून, पश्चिम युरोपीय देशांची संघटना ‌‘नाटो‌’ आता काय निर्णय घेणार, हेदेखील पाहावे लागणार आहे.

इराणचा जोरदार प्रतिहल्ला

इराण, इस्रायल, अमेरिका युद्धाबाबत अद्यापही रशिया आणि चीन यांनी कोणतीही भूमिका घेतलेली नाही. तर भारताचेदेखील ‌‘थांबा आणि वाट पाहा,‌’ असे धोरण आहे. परंतु, सध्या इराणवर नियंत्रण प्रस्थापित करण्यात इस्रायल आणि अमेरिकेला अडचणी निर्माण होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळेच अमेरिकेने एक पाऊल मागे घेत इराणमध्ये धार्मिक राजवट राहील, आम्हाला फक्त खामेनी यांना हटवायचे होते, असे स्पष्ट करण्यास सुरुवात केली. याचे प्रमुख कारण म्हणजे इराणने केलेला जोरदार प्रतिहल्ला हेच आहे.

कोरोना महामारीनंतर युरोपियन देशांच्या अर्थव्यवस्थेचे कंबरडे मोडले आहे. त्यामध्ये रशिया-युक्रेन संघर्षाने भर पडली आहे. त्यामुळेच कोणत्याही युरोपियन देशाचा आर्थिक विकासाचा दर हा 3 टक्केदेखील नाही. त्यांच्याकडे जीवनावश्यक वस्तूंचीदेखील टंचाई निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या उपद्रव मूल्यांमुळे होत असलेल्या संघर्षात युरोपीय देश पडणार नसल्याचे सध्या तरी चित्र दिसत आहे.

अरब देशांमध्ये एकमेव इराण हा असा देश आहे, जो इस्रायलच्या अस्तित्वालादेखील धक्का देऊ शकतो. अरब देशांमधील हा एक बलवान देश आहे. त्यामुळे त्यांच्या म्होरक्याला समाप्त करून त्या देशावर नियंत्रण मिळवण्याचे अमेरिकेचे स्वप्न एवढे सहजशक्य होणार नाही. त्यासाठी इराणमध्ये जमिनीवर सैनिक उतरावे लागतील, केवळ हवाई हल्ले करून हे शक्य होणार नाही. परंतु, त्यासाठी अमेरिका तयार होणार नाही; कारण व्हिएतनाममध्ये अशा प्रकारच्या जमिनीवरील लढाईत त्यांचे हजारो सैनिक मारले गेले असून, त्यांचे प्रचंड नुकसान झालेले आहे.

संघर्ष लवकर निवळणे लाभदायक

रशिया व चीनचा विचार केला, तर रशिया थेट युद्धात सहभागी होणार नाही. कारण, त्यांचे अगोदरच युक्रेनबरोबर युद्ध सुरू आहे. चीनचे इराणबरोबर चांगले संबंध असून, चीनची इराणमध्ये गुंतवणूकदेखील मोठी आहे. मात्र, कोरोनानंतर चीनची अर्थव्यवस्था अडचणीत आली आहे. त्यामुळे चीन युद्धात सहभागी होणार नाही. भारताचा विचार केला, तर भारताचे आखातासंदर्भातील धोरण निश्चित नाही. प्रत्येक देशाबरोबर वेगवेगळे संबंध असून, ते द्विपक्षीय आहेत. त्यामुळे ‌‘थांबा आणि वाट पाहा‌’ हेच आपले धोरण योग्य आहे. तथापि, भारताच्या विकासासाठी हा संघर्ष जितका लवकर संपेल तेवढे फायद्याचे ठरणार आहे; अन्यथा भारताच्या अडचणींमध्ये भर पडणार आहे.

( शब्दांकन : गणेश खळदकर)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT