पुणे

डॉ. तावरेच्या सहकार्‍यांचीही चौकशी : गुन्हे शाखेतील पोलिस अ‍ॅक्टिव्ह मोडवर

Laxman Dhenge

पुणे : पुढारी वृत्तसेवा : कल्याणीनगर ड्रंक अँड ड्राइव्हप्रकरणी ससूनमधील न्यायवैद्यक प्रयोगशाळेचा डॉ. अजय तावरे याच्या धक्कादायक खुलाशानंतर त्याचे सहकारी डॉक्टर आणि दोन परिचारिकांची चौकशी गुन्हे शाखेच्या पोलिसांनी केली. रक्ताचे नमुने बदलण्यात डॉ. तावरे, डॉ. श्रीहरी हाळनोर आणि शिपाई अतुल घटकांबळे यांची भूमिका महत्त्त्वाची असल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले. त्यामुळे ही चौकशी करण्यात आली.

या प्रकरणात अल्पवयीन आरोपीला वाचविण्यासाठी त्याच्या वडिलाने डॉ. अजय तावरे याला हाताशी धरून तपासणीसाठी रक्त न देता अन्य दुसर्‍याचे रक्त दिले होते. यामध्ये डॉ. तावरे, डॉ. हाळनोर आणि घटकांबळे यांच्याशी आर्थिक व्यवहार झाला होता. पोलिसांच्या तपासात हा धक्कायक प्रकार उघड झाला होता. त्यामुळे याच कार्यालयात काम करणार्‍या महिला डॉक्टरांचा गुन्हे शाखेच्या कार्यालयात बुधवारी जबाब नोंदविण्यात आला.

गुन्हे शाखेने गुरुवारी ससून रुग्णालयात याच विभागात कार्यरत असलेल्या दोन परिचारिकांना चौकशीसाठी बोलावले. रक्ताचे नमुने घेतले त्या दिवशी नेमके काय झाले, कोण कोण ससून रुग्णालयात आले होते, नेमके त्या दिवशी कोणाचे रक्त काढण्यात आले, रक्ताचे नमुने कोठे टाकण्यात आले, याबाबतही परिचारिकांची चौकशी करण्यात आली. याप्रकरणी घटनाक्रम जुळविण्याचा प्रयत्न गुन्हे शाखेकडून केला जात आहे.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT