पुणे; पुढारी वृत्तसेवा : आयटी कंपनीत काम करणार्या चरणराज लोखंडे याने पु. ल. देशपांडे लिखित 'अपूर्वाई' हे पुस्तक विकत घेतले अन् त्याने ते पुस्तक चार दिवसांत वाचून काढले…. आयटीतल्या व्यग्र दिनक्रमातून वेळ काढून चरणराज सध्या वाचनाच्या दुनियेत रमला आहे. चरणराज याच्याप्रमाणे आयटी क्षेत्रातील 25 टक्के तरुणाई वाचनाकडे वळली असून, ऐतिहासिक, चरित्रात्मक, मोटिव्हेशल, कॉर्पोरेट, रहस्यात्मक…. अशा विविध 'जॉनर'ची पुस्तके आयटीतील तरुण वाचत आहेत. वर्क फ्राॅम होममुळे होणारा शारीरिक त्रास आणि नैराश्य बाजूला सारत ते फावल्या वेळेत वाचन करत असून, पुस्तके ही आयटीतील तरुणाईचा मित्र बनली आहेत.
कोरोनामुळे गेल्या अडीच वर्षांपासून पुण्यातील आयटी क्षेत्रातील तरुण वर्क फ्राॅम होममध्ये व्यग्र आहेत. एकाच ठिकाणी संगणकावर बसून काम करताना तरुणाईला शारीरिक त्रासासह नैराश्यही येत आहे. त्यामुळे अनेक जण वर्क फ्राॅम होमला वैतागले असून, या व्यग्र वेळापत्रकात कामासोबतच आपली आवड जपण्याचा प्रयत्न ते करीत आहेत. त्यामुळे काही आयटीतील तरुण वाचनाची आवड जपत आहेत. वाचनासाठी शनिवारी आणि रविवारी तरुण-तरुणी वेळ काढत आहेत.
सध्याच्या घडीला 75 टक्के तरुणाई पुस्तक वाचनाला प्राधान्य देत आहे आणि त्यातील 20 ते 25 टक्के तरुण हे आयटी क्षेत्रात काम करणारे आहेत. पु. ल. देशपांडे यांच्यापासून ते व. पु. काळे यांच्यापर्यंत… अच्युत गोडबोले यांच्यापासून ते अमिश त्रिपाठी यांच्यापर्यंत… अशा नामवंत लेखकांची पुस्तके वाचली जात आहेत. काहीजण तर पुस्तकांवर ब्लॉगही लिहित असून, सोशल मीडियावर ते ब्लॉगद्वारे अभिप्राय नोंदवत आहेत. शनिवारी (दि. 12) साजरा होणार्या आंतरराष्ट्रीय युवक दिनानिमित्त दै. 'पुढारी'ने याविषयी आढावा घेतला.
आयटी कंपनीत काम करणारा ओंकार जोशी म्हणाला, 'वर्क फ्राॅम होममुळे सध्या कामाचा ताण वाढला आहे. सातत्याने संगणकासमोर बसल्यामुळे शारीरिक दुखणीही ओढवत आहेत. काही वेळा नैराश्यही जाणवते. त्यामुळेच स्वतःला वेळ देण्यासाठी मी वाचनाकडे वळलो आहे. मी अमिश त्रिपाठी, पु. ल. देशपांडे, व. पु. काळे, आचार्य अत्रे अशा विविध लेखकांची पुस्तके वाचली आहेत. पुस्तके वाचल्यामुळे मला नवीन विषयांची माहितीही मिळत असून, भाषिक ज्ञानही वाढत आहे.'
पुस्तक विकत घेऊन वाचणार्यांमध्ये 75 टक्के संख्या ही तरुणांची आहे. त्यात आयटीतील नोकरदारांची संख्याही मोठी आहे. काही जण प्रत्यक्ष दालनात येऊन, तर काही जण ऑनलाइन पुस्तके विकत घेतात. ऐतिहासिक, मोटिव्हेशनल, कॉर्पोरेट अशा विषयांवरील पुस्तके तरुण विकत घेत आहेत.
– रसिका राठिवडेकर,
अक्षरधारा बुक
हेही वाचा