सातारा : महामार्गाची चाळण; खड्डे जीवघेणे; टायर फुटीच्या घटना वाढल्या | पुढारी

सातारा : महामार्गाची चाळण; खड्डे जीवघेणे; टायर फुटीच्या घटना वाढल्या

सातारा; पुढारी वृत्तसेवा :  पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्ग सहापदरीकरणाच्या कामासंदर्भात सुरुवातीपासून तक्रारींचा ओघ असतानाच आता खड्ड्यांचा महामार्ग मृत्यूचा सापळा बनला आहे. जीवघेणे खड्डे पाचवीलाच पुजलेले आहेत. पुणेपासून ते कागलपर्यंत महामार्गाची अक्षरश: चाळण झाली आहे. दै. ‘पुढारी’ने आवाज उठवल्यानंतर काही ठिकाणी डागडुजी केली. मात्र उर्वरित महामार्ग खड्ड्यांनी गिळला असून तो आहे तसाच आहे. वाहनांच्या टायर फुटीच्या घटना वाढल्या असून सेवा रस्तेही खड्ड्यात गेले आहेत.

ऑगस्ट सुरू झाल्यानंतर सार्‍यांनाच आता गणेशोत्सवाचे वेध लागले आहे. गणेशोत्सवामुळे गावी येणार्‍या चाकरमान्यांची व पर्यटनासाठी बाहेर पडणार्‍यांची संख्या वाढणार आहे. चाकरमानी मोठ्या संख्येने आपल्या मुळ घराकडे निघणार असून, महामार्गावरून जाताना त्यांना बरीच कसरत करावी लागणार आहे. सावध व्हा, वाहने सावकाश चालवा अन्यथा महामार्गावरील खड्डे घात करतील, अशी भयावह परिस्थिती आहे. ‘महामार्गावर काय खरं नाही, हे ध्यानात ठेवा’, असे म्हणायची वेळ आली आहे.

पुणे-सातारा महामार्ग कायमच चर्चेत राहिला आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून या रस्त्याकडे कायमच दुर्लक्ष झाले आहे. मुदत संपून 7 वर्षे झाल्यानंतरही या रस्त्याचे सहापदरीकरणाचे काम पूर्ण झालेले नाही. सध्या हा मार्ग खड्ड्यांचा महामार्ग बनला आहे. सातार्‍यासह खंडाळा, शिरवळ, पाचवड, उंब्रज, कराड या भागातही खड्डे पडले आहेत. रात्रीच्या वेळी खड्ड्यांचा अंदाज येत नसल्याने अपघात वाढत आहेत. याबाबत लोकप्रतिनिधींनी आंदोलने केली मात्र, तरीही याबाबत काहीही ठोस उपाययोजना होत नसल्याचे वास्तव आहे.

सातारा तालुक्याच्या हद्दीतील 30 ते 35 किमी अंतरात गेल्या काही दिवसात खड्ड्यांमुळे अपघाताची संख्या वाढली आहे. त्यामुळे नागरिकांना जीव मुठीत घेवून प्रवास करावा लागत आहे. प्रशासनाला मात्र याचे काहीही सोयरसुतक नाही. खड्ड्यांमुळे दुचाकी, चारचाकी चालकांना आपल्या वाहनाचा टायर फुटतो की काय? असा प्रश्न पडत आहे. लिंब येथे महामार्गाला लागलेला उपळा, चाहूरमध्ये खड्ड्यांमुळे वाहनांचे फुटलेले टायर, वाढे फाटा परिसरातील सेवा रस्त्यावर पडलेले खड्डे हे दुष्टचक्र थांबणार आहे की नाही? हा प्रश्न न सुटणारा आहे.

स्थानिकांना गमवावे लागताहेत जीव

लगतच्या गावांतील नागरिकांनाही ये-जा करताना महामार्गावरून वाहतूक करावी लागते. खड्ड्यांमुळे या स्थानिकांनाही जीव गमवावा लागत असल्याचे चित्र आहे.काही महिन्यांपूर्वी डांबरीकरण करून खड्डे भरण्यात आले होते. हे खड्डे अवघ्या काही दिवसांमध्ये पुन्हा जैसे थे झाले आहेत.

तत्कालीन जिल्हाधिकार्‍यांनीही फाडला होता बुरखा

सातारा जिल्ह्याच्या हद्दीतील महामार्ग वाहतुकीसाठी धोकादायक झाल्याचे सांगत खुद्द तत्कालीन जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी एका बैठकीत रिलायन्सच्या कामाचा बुरखा फाडला होता. यानंतर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीही या कामावर नाराजी व्यक्त केली होती.

Back to top button