College Fee Hike Pudhari
पुणे

Institutional Quota Three Times Fee: संस्थास्तर कोट्यातील प्रवेशासाठी तीनपट शुल्क आकारणीला विरोध; निर्णय रद्द करण्याची युवासेनेची मागणी

विद्यार्थ्यांवर दुहेरी आर्थिक भार; अतिरिक्त डोनेशन घेणाऱ्या महाविद्यालयांवर कारवाईची मागणी

पुढारी वृत्तसेवा

पुणे: राज्यातील खासगी व्यावसायिक महाविद्यालयांमध्ये संस्थास्तर कोट्यातून (इन्स्टिट्यूशनल कोटा) प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांकडून नियमित शुल्काच्या तीनपट शुल्क आकारण्यास देण्यात आलेली मुभा अन्यायकारक असून, हा निर्णय तातडीने रद्द करण्यात यावा, अशी मागणी युवासेनेचे राज्य सहसचिव कल्पेश यादव यांनी राज्य सरकारला केली आहे. याबाबत त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील आणि उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे मुख्य अपर सचिव वेणुगोपाल रेड्डी यांना निवेदन दिले आहे.

अभियांत्रिकी, वैद्यकीय, फार्मसी, व्यवस्थापन आणि विधी, यांसारख्या व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये एकाच वर्गात शिकणाऱ्या आणि समान शैक्षणिक सुविधा घेणाऱ्या विद्यार्थ्यांकडून केवळ प्रवेश पद्धतीवरून तीनपट शुल्क आकारणे चुकीचे असल्याचे पत्रात म्हटले आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार अनिवासी भारतीय कोट्यातील (एनआरआय) प्रवेशासाठी अधिक शुल्क आकारण्याची विशिष्ट तरतूद असताना त्याच धर्तीवर सर्वसामान्य भारतीय विद्यार्थ्यांसाठी संस्थास्तर कोट्यात तीनपट शुल्क आकारण्याची मुभा देणे कितपत योग्य आहे. एका बाजूला संस्थास्तर कोट्यात तीनपट शुल्क आणि दुसऱ्या बाजूला नियमित शुल्कातही वाढ, असा दुहेरी आर्थिक भार विद्यार्थ्यांवर पडत आहे.

शुल्क नियामक प्राधिकरणाने (एफआरए) मंजूर केलेल्या शुल्कात विद्यार्थ्यांना अपेक्षित असलेली कपात किंवा दिलासा मिळण्याऐवजी शुल्काचा भार कायम राहणे तसेच संस्थास्तर कोट्यात तीनपट शुल्क आकारण्याची मुभा देणे, यामुळे संपूर्ण शुल्क नियमनव्यवस्थेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

शिक्षणाचे व्यापारीकरण रोखण्यासाठी आणि पारदर्शकता टिकवण्यासाठी एफआरएने निश्चित केलेले नियमित वाजवी शुल्कच आकारण्याचे स्पष्ट आदेश द्यावेत. तसेच, अतिरिक्त डोनेशन घेणाऱ्या संस्थांची चौकशी करून कठोर कारवाई करावी. राज्यातील लाखो विद्यार्थी व पालकांच्या हिताचा हा प्रश्न असून, संस्थास्तरावरील प्रवेश प्रक्रिया सुरू होण्यापूर्वी शासनाने यावर कठोर निर्णय घेऊन विद्यार्थ्यांना दिलासा द्यावा, अशी अपेक्षा देखील यादव यांनी व्यक्त केली आहे.

रोख रक्कम आणि डोनेशनचा सुळसुळाट

तीनपट शुल्क आकारणीच्या नावाखाली काही महाविद्यालयांकडून विद्यार्थी व पालकांकडे ‘तडजोडी’च्या नावाखाली रोख स्वरूपात अतिरिक्त रकमेची (डोनेशन) मागणी होत असल्याच्या गंभीर तक्रारी समोर येत आहेत. यामुळे प्रवेश प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT