पुणे

रक्त पिशव्यांसाठी निर्जंतुकीकरण यंत्रणा बसवा; खासगी, सरकारी रक्तपेढ्यांना आदेश

Laxman Dhenge
पुणे : पुढारी वृत्तसेवा : रक्ताचा अपव्यय टाळण्याच्या दृष्टीने रक्त पिशव्यांसाठी निर्जंतुकीकरण यंत्रे बसवण्याचे आदेश खासगी आणि सरकारी रक्तपेढ्यांना देण्यात आले आहेत. ज्या सरकारी रक्तपेढ्यांकडे सध्या साधने नाहीत, तेथे उपकरणे उपलब्ध करून देण्याचा निर्णय शासनातर्फे घेतला आहे. बरेचदा लहान मुलांना एखाद्या आजारामध्ये रक्ताची आवश्यकता असते. मात्र, रक्त कमी प्रमाणात लागत असल्याने रक्त पिशवीतील इतर रक्त वाया जाते. रक्त पिशव्यांसाठी निर्जंतुकीकरण यंत्रे बसवल्यामुळे रक्त वाया जाणे आणि एक पिशवी एकापेक्षा अधिक दात्यांसाठी वापरण्याचे प्रमाण कमी होईल. तसेच, रक्त संक्रमणादरम्यान एकाधिक दात्याच्या संपर्कात येणे टाळता येऊ शकेल. रक्ताचा अपव्यय टाळण्यासाठी आणि रक्त संक्रमणादरम्यान अनेक दात्यांच्या संपर्कात येऊ नये, यासाठी राज्याच्या आरोग्य विभागाने हा निर्णय घेतला आहे.

कशी काम करेल यंत्रणा?

एका रक्तपिशवीमध्ये 350 एमएल रक्त साठवले जात असेल आणि त्यातील केवळ 50 ते 100 एमएल वापरले जाणार असेल तर उर्वरित रक्त वाया जाते किंवा अशुध्द होते. निर्जंतुकीकरण यंत्रणेमुळे रक्तपिशवीतील उर्वरित रक्त छोट्या पाऊचमध्ये साठवून ठेवले जाणार आहे आणि तत्पूर्वी ते रक्त निर्जंतुक केले जाणे शक्य होणार आहे.  त्याच रुग्णांना पुढील काही दिवसांत पुन्हा रक्ताची गरज भासल्यास निर्जंतुक केलेले रक्त वापरता येणार आहे.
जिल्ह्यातील सर्व रक्तपेढ्यांना निर्जंतुकीकरण यंत्रांच्या उपलब्धतेचा तपशील सादर करण्यासाठी पत्र दिले जाणार आहे. रक्तपेढ्यांना प्राधान्याने उपकरणे बसवण्यास सांगितले जाईल किंवा कारवाईला सामोरे जावे लागेल. मशीन चालवणार्‍या कर्मचार्‍यांची लसीकरण स्थिती याविषयी तपशील सादर करण्यास सांगितले जाईल.
    – डॉ. नागनाथ येमपल्ले, जिल्हा शल्यचिकित्सक
हेही वाचा
SCROLL FOR NEXT