पुणे

पुरंदरमध्ये जलसंधारण, भूजल पुनर्भरण कामांची पाहणी

अमृता चौगुले

सासवड(पुणे); पुढारी वृत्तसेवा : जलशक्ती अभियानांतर्गत जलशक्ति मंत्रालयातील सहसचिव पीयुष सिंग तसेच केंद्रीय भूमिजल मंडळ येथील अनु वेंकटीरमण यांनी पुणे जिल्ह्यातील पुनर्भरण कामांची पाहणी केली. जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांच्या उपस्थितीत तसेच इतर विभागातील अधिकार्‍यांच्या उपस्थितीत विभागनिहाय कामांच्या प्रगतीबाबत बैठक झाली.

या बैठकीनंतर पुरंदर तालुक्यातील सासवड नगरपरिषद इमारतीच्या छतावरील पावसाचे पाणी संकलन कामाचे, उदाचीवाडी येथील जलजीवन मिशन अंतर्गत झालेल्या पाणीपुरवठा विहिरीचे आणि या विहिरीलगत अटल भूजल योजनेंतर्गत घेण्यात आलेल्या 'रिचार्ज शाफ्ट' कामांची पाहणी केली. पिसर्वे येथे अमृतसरोवर योजनेंतर्गत राबविण्यात आलेल्या पाझर तलावाच्या कामाची पाहणी केली. कामाच्या प्रगतीबाबत तसेच लोकसहभागाबाबत पीयुष सिंग यांनी विशेष कौतुक केले.

क्षेत्रीय पाहणीदरम्यान केंद्रीय सहसचिव जलशक्ती मंत्रालय पीयुष सिंग, केंद्रीय भूमी जल मंडळाचे अनु वेंकटीरमण, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या समवेत उपविभागीय अधिकारी मीनाज मुल्ला, जिल्हा जलसंधारण अधिकारी सुजाता हांडे, भूजल सर्वेक्षण विभागातील वरिष्ठ भूवैज्ञानिक एस.एस गावडे, लघु पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता गौरव बोरकर, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता प्रकाश खताळ, गटविकास अधिकारी पुरंदर अनिता पवार, तालुकास्तरीय अधिकारी तसेच उदाचीवाडी व पिसर्वे ग्रामपंचायतचे सरपंच, पदाधिकारी, ग्रामस्थ आदी उपस्थित होते.

अटल भूजल योजनेंतर्गत बारामती पुरंदर व इंदापूर या तालुक्यांतील 118 गावांमध्ये 563 रिचार्ज शाफ्ट प्रस्तावित असून, त्यापैकी 440 कामे पूर्ण झालेली आहेत. उर्वरित कामे प्रगतिपथावर आहेत. पुरंदर तालुक्यातील योजनेत समाविष्ट असलेल्या गावांमध्ये रिचार्ज शाफ्ट, ट्रेंच कम रिचार्ज शाफ्ट या उपायोजना घेण्यात येत असून, उदाचीवाडी येथे अटल भूजल योजनेंतर्गत प्रोत्साहन निधीच्या माध्यमातून पाच रिचार्ज शाफ्टची कामे पूर्ण करण्यात आलेली आहेत. रिचार्ज शाफ्ट या उपायोजनेमुळे परिसरातील भूजल पातळी उंचावण्यास मदत होणार आहे. यामुळे पाणीटंचाई कालावधीमध्ये परिसरातील भूजल स्रोत शाश्वत होण्यास मदत होणार आहे. पूर्ण झालेली कामे संबंधित ग्रामपंचायतीस हस्तांतरितदेखील करण्यात आलेली असून, ग्रामपंचायतमार्फत या कामांची देखभाल-दुरुस्ती प्रत्येक पावसाळ्यापूर्वी करणे आवश्यक आहे.

– डॉ. राजेश देशमुख, जिल्हाधिकारी, पुणे

हेही वाचा

SCROLL FOR NEXT