पुणे: पुणे जिल्हा परिषदेतील बांधकाम विभागात एक गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. उपअभियंता बाळासाहेब सायंबर यांनी मुळशी तालुक्यातील एका खासगी व्यक्तीकडून जिल्हा परिषद कार्यालयात थेट संगणकावर गोपनीय माहिती टाकून घेतल्याचा प्रकार समोर आला आहे.
संबंधित व्यक्तीने कर्मचार्यांच्या खुर्चीत बसून रजिस्टरवरील माहिती संगणकात भरली, तर काही बिलेदेखील पास केल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे या खासगी व्यक्तीकडे संगणकाची की आणि पासवर्डदेखील दिले गेले होते. हा संपूर्ण प्रकार कार्यालयातील सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी याप्रकरणी काय कारवाई करतात याकडे लक्ष लागले आहे. (Latest Pune News)
सायंबर यांनी गेल्या आठवड्यात हा प्रताप केला. विशेष म्हणजे अशा खासगी व्यक्तीच्या हातात संगणक देऊन गोपनीय पासवर्डची माहितीदेखील याच खासगी व्यक्तींकडून संगणकीय कामकाजामध्ये वापरली जाते.
सायंबर यांनी याच पद्धतीने मुळशी तालुक्यातील ठेकेदाराकडे काम करणार्या एका खासगी व्यक्तीकडून जिल्हा परिषदेत काही तास काम करून घेतले. काही रजिस्टरसमोर मांडून त्याची माहिती खासगी व्यक्ती भरत होती. काही बिलेदेखील अशाच पद्धतीने पास केल्याची माहिती समोर आली आहे. हा सर्व प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला.