दौंडला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका चुरशीच्या; राहुल कुल आणि रमेश थोरात आमने-सामने
रामदास डोंबे
खोर: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या दौंड तालुक्यातील निवडणुका चुरशीच्या होणार आहेत. यानिमित्ताने पुन्हा एकदा आ. राहुल कुल आणि माजी आ. रमेश थोरात यांच्यातील संघर्ष अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. मतदारांचा कल कोणत्या बाजूने झुकतो हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकात कुल-थोरात आमने-सामने येणार असून, स्थानिक पातळीवरील राजकीय ताकद आजमावण्याची एक संधी असून कुल आणि थोरात हे दोघेही आपापल्या समर्थकांसह निवडणुकीत जोर लावणार हे नक्की आहे. या दोन्ही नेत्यांमध्ये गेल्या काही वर्षांपासून दौंड तालुक्यात मोठी चुरशीची स्पर्धा सुरू आहे. (Latest Pune News)
राहुल कुल हे सत्ताधारी भाजपशी संबंधित असून त्यांचा तालुक्यावर मजबूत प्रभाव आहे, तर रमेश थोरात हे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते असून त्यांच्या नेतृत्वाखालील गटही अनेक गावांत मजबूत आहे. मागील जिल्हा परिषद निवडणुकीत रमेश थोरात यांनी 6 पैकी 5 जागा तर पंचायत समितीला 12 पैकी 11 जागा मिळवीत कुल गटाला मोठा धक्का दिला होता.
विधानसभा निवडणुकीवेळी रमेश थोरात यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करून निवडणूक लढल्याने त्यांच्या समर्थकांमध्ये उत्साह निर्माण झाला होता; मात्र राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये झालेल्या फुटीमुळे अनेक महत्त्वाचे कार्यकर्ते अजित पवार यांच्या गटातच असल्याने थोरात यांच्या गटात अस्थिरता आहे.
सद्य:स्थितीत स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये राहुल कुल यांचा प्रभाव वाढलेला आहे. त्यांनी भीमा पाटस साखर कारखान्याच्या माध्यमातून स्थानिकांमध्ये आपली पकड मजबूत केली आहे, तर दुसरीकडे रमेश थोरात यांचे समर्थक अजूनही तालुक्यात सक्रिय आहेत. ते पुन्हा स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आपला प्रभाव कायम ठेवण्यासाठी प्रयत्न करणार का? हे पाहणे तितकेच महत्त्वाचे आहे.
या दोघांमध्ये विधानसभा, जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि बाजार समितीच्या निवडणुकांमध्ये सातत्याने चुरशीची लढत पाहायला मिळाली आहे. विशेषतः दौंड कृषी उत्पन्न बाजार समितीवर वर्चस्व मिळवण्यासाठी दोघांमध्ये तीव— स्पर्धा झाली. तब्बल 25 वर्षांनी सत्तांतर करत आ. राहुल कुल यांनी बाजार समितीवर झेंडा फडकावला. दोन्ही नेत्यांसाठी येणार्या निवडणुका प्रतिष्ठेच्या लढती असून कार्यकर्ते आणि समर्थक जोरदार तयारीत आहेत.
सध्याची राजकीय स्थिती
दौंड तालुक्यात कुल-थोरात व्यतिरिक्त अजित पवार व शरद पवार यांचे समर्थक असलेले अप्पासाहेब पवार, वीरधवल जगदाळे, वैशाली नागवडे, नितीन दोरगे यांची नेमकी भूमिका काय असणार हे देखील तितकेच महत्त्वाचे आहे. आगामी निवडणुका केवळ स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी नसून, त्या आगामी विधानसभा निवडणुकीसाठी तालुक्यातील राजकीय ताकद आजमावण्याची संधी म्हणून पाहिल्या जात आहेत.

