पुणे

निकृष्ट पाणवठे कोरडे ठणठणीत; वन्यजीवांचे पाण्याअभावी हाल

Laxman Dhenge

खडकवासला : पुढारी वृत्तसेवा : लाखो रुपये खर्चून वन विभागाने सिंहगडच्या जंगलात वन्यप्राण्यांसाठी बांधलेले पाणवठे (तळे) निकृष्ट कामामुळे कोरडे ठणठणीत पडले आहेत. त्यामुळे ऐन उन्हाळ्यात पाण्याअभावी वन्यजीवांचे हाल सुरू असल्याचे गंभीर चित्र पुढे आले आहे. या पाणवठ्यांत तातडीने पाणी भरण्याची मागणी वन्यजीवप्रेमींनी केली आहे. सिंहगड किल्ल्याच्या पायथ्याला असलेल्या घेरा सिंहगड येथील शिवकालीन काळुबाई मंदिराजवळ वनविभागाने लाखो रुपये खर्च करून सिमेंटचा पाणवठा बांधला आहे. मात्र, या तळ्यात सध्या पाण्याचा एकही थेंब नाही. या भागात दाट जंगल आहे. डोंगर दर्‍यातील नैसर्गिक पाणवठे कोरडे पडले आहेत. डोंगर कडेही उन्हाच्या तीव्रतेने आटले आहेत. त्यामुळे जंगलातील वन्यप्राणी पाण्यासाठी खडकवासला धरण व जवळच्या ओढे- नाल्यांतील डबक्यावर धाव घेत आहेत.

सिंहगडाच्या जंगलात काळुबाई पाणवठा वन्यप्राणी, पक्षाच्या संवर्धनासाठी महत्त्वाचा आहे. मात्र, बांधल्यापासूनच या पाणवठ्यात पावसाळ्यातही पाणी साठत नाही. सिंहगडपासून पानशेत वरसगाव ते रायगड जिल्ह्याच्या हद्दीपर्यंतच्या सह्याद्रीच्या डोंगर रांगात वनविभागाचे घनदाट जंगल पसरले आहे. पूर्वी हा घनदाट जंगलाचा परिसर खानापूर (ता. हवेली) वनक्षेत्रात होता. मात्र, त्यानंतर तालुकानिहाय वनपरिक्षेत्र विभाग करण्यात आला आहे. भांबुर्डा, वेल्हे, मुळशी अशा तीन वनक्षेत्रात हे जंगल विभागले आहेत.
या घनदाट जंगलात बिबटे, हरीण, चितळ, भेकर, रानडुक्कर, उदमांजर, जंगलीमांजर, वानर, तरस आदी शेकडो प्राण्यांसह पक्षांचा अधिवास आहे. दुर्मीळ वन्यप्राणी, पक्षी या जंगलात आहेत. वन्यजीवांची संख्या प्रचंड आहे मात्र पाणवठ्यांची संख्या जेमतेम आहे. लाखो रुपये खर्च करूनही पाणवठ्यात पाणी नाही, असे चित्र आहे. काही ठिकाणी कृत्रिम पाणवठे तयार करण्यात आले आहेत.
पाण्यासाठी ससे, मोर, माकडे आदी वन्यजीव स्थलांतर करत आहेत. दुसरीकडे वन्यप्राण्यांच्या संवर्धनासाठी वनविभाग कोट्यवधी रुपये खर्च करतआहे.

घेरा सिंहगडचा काळुबाई पाणवठा कोरडा पडल्याने टँकरने पाणी टाकण्यात येणार आहे. मंगळवारी टँकर पाठवला होता. मात्र, खराब रस्त्यामुळे टँकर गेला नाही. तळ्यात पाणी ओतल्यावर पाण्याची गळती समजणार आहे. त्यानंतर तळ्याची तातडीने दुरुस्ती करण्यात येणार आहे.

– समाधान पाटील, वनपरिमंडल अधिकारी, खानापूर

पाच हजार हेक्टरहून अधिक जंगल

शिवकाळापासून सिंहगड, पानशेत परिसरात घनदाट जंगले आहेत. ब्रिटिश राजवटीत वनविभाग अस्तित्वात आला तेव्हापासून वनखात्याकडे या जंगलांची मालकी आहे. सिंहगडपासून रायगड जिल्ह्याच्या हद्दीपर्यंत पाच हजार हेक्टरहून अधिक जंगल वनखात्याकडे आहे. या परिसरात देवराई, गावोगावच्या शिवकालीन देवस्थानच्या वनराई मोठ्या प्रमाणात आहेत. असे असताना वन्यप्राण्यांच्या पाणवठ्याकडे वनविभागाने दुर्लक्ष केले आहे.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT