Nashik | शरद पवार गटाचे निफाडमधून मिशन लोकसभा | पुढारी

Nashik | शरद पवार गटाचे निफाडमधून मिशन लोकसभा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाची जाहीर सभा दि. १३ मार्च रोजी निफाडमध्ये आयोजित करण्यात आली आहे. या सभेमधून पक्षाचे नेते खा. शरद पवार हे लोकसभेचे रणशिंग फुंकणार आहेत. दरम्यान, निवडणूक आयोगाकडून पवार गटाला तुतारी हे चिन्ह मिळाल्यानंतर पहिल्यांदाच खा. पवार जिल्हा दौऱ्यावर येत असल्याने पक्षाकडून त्यांच्या स्वागताची जय्यत तयारी केली जात आहे.

अवघ्या आठ ते दहा दिवसांमध्ये लोकसभा निवडणुकीचा बिगुल वाजणार आहे. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांनी तयारीवर जोर दिला आहे. लोकसभेच्या धुमाळीत नाशिकला व्हीव्हीआयपींची पसंती मिळते आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी व शिवसेना उबाठा गटाचे उद्धव ठाकरे यांनी नाशिकमध्ये हजेरी लावली. तसेच येत्या ९ तारखेला मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत नाशिकला मनसेच्या राज्यस्तरीय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानंतर खा. शरद पवार हेदेखील नाशिकचा दौरा करणार आहेत.

खा. पवार यांची बुधवारी (दि. १३) निफाडमधील उगाव रोडवरील कांदा मार्केटमध्ये जाहीर सभा होणार आहे. या सभेच्या तयारीसंदर्भात पक्षाचे प्रमुख नेते व पदाधिकाऱ्यांची बैठक गुरुवारी (दि. ७) नाशिकमध्ये पार पडणार आहे. महाविकास आघाडीच्या जागा वाटपात दिंडाेरी लोकसभा मतदारसंघावर खा. पवार गटाने दावा केला आहे. एवढेच नव्हे, तर पक्षांतर्गत इच्छुकांनी जोरदार तयारीही सुरू केली आहे. या पार्श्वभूमीवर खा. पवार यांची जाहीर सभा होत असल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला आहे. सभा यशस्वी करण्यासाठी प्रत्येक कार्यकर्ता अंग झटकून कामाला लागला आहे.

खा. पवारांकडे लक्ष
केंद्र शासनाने कांदा निर्यातबंदी काही प्रमाणात शिथिल केली असली, तरी आजही कांद्याला भाव मिळत नाही. त्याच वेळी अन्य शेतमालाचे भाव पडले असून, महागाई व बेरोजगारींवरून विरोधकांकडून शासनाला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला जात आहे. या सर्व पार्श्वभूमीवर निफाड येथील जाहीर सभेतून खा. शरद पवार हे कार्यकर्त्यांना काय संदेश देणार याकडे अवघ्या राजकीय जगताचे लक्ष लागले आहे.

Back to top button