बिटकॉईन प्रकरण : पोलिस अधिकारीच चौकशीच्या फेर्‍यात!

बिटकॉईन प्रकरण : पोलिस अधिकारीच चौकशीच्या फेर्‍यात!

पुणे : पुढारी वृत्तसेवा : बिटकॉईन या आभासी चलन प्रकरणाचा सखोल तपास करून कोट्यवधी रुपयांचे बिटकॉईन लाटणार्‍यांचा पर्दाफाश करणारे पोलिस अधिकारीच आता चौकशीच्या फेर्‍यात अडकले आहेत. या गुन्ह्यातील आरोपी जामिनावर सुटल्यानंतर मॅडम साहेबांची भेट घेताच ही सूत्रे फिरल्याची उलट सुलट चर्चा सुरू आहे. दोन पोलिस अधिकारी आणि दोन कर्मचारी यांची मागील आठ दिवसांपासून गोपनीय चौकशी सुरू आहे. त्यांचे मोबाईल, लॅपटॉप, इतर गॅझेट ताब्यात घेण्यात आले असून, याबाबत कमालीची गोपनीयता बाळगण्यात आली आहे.

पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्याकडे विचारणा करण्यात आली असता त्यांनी असे काही नसल्याचे म्हटले. मात्र, मागील काही दिवसांपासून या चौघांची चौकशी सुरू असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. त्यांना दररोज सकाळी बोलावून रात्री उशिरापर्यंत आर्थिक गुन्हे शाखेत थांबवून ठेवले जात आहे. तर, नांदेड येथील एका तक्रारदाराच्या घरी जाऊन पोलिसांनी जबाब नोंदविला आहे. तसेच, तत्कालीन सायबरतज्ज्ञांनी जप्त केलेले बिटकॉईन कोठून कोठे गेले, त्याचबरोबर हवाला झाला का, याबाबतचे ऑडिट करणार्‍या लेखापरिक्षकालादेखील चौकशीसाठी हजर राहण्याबाबत सांगण्यात आले आहे. याप्रकरणामध्ये दोघा सायबरतज्ज्ञांना अटक केली होती. त्यातील एकाच्या खात्यातून बिटकॉईन जप्त करण्यात आले होते, तर दुसर्‍याच्या खात्यातून अंगडियाकडे गेलेले बिटकॉईन जप्त करण्यात आले होते.

देशभरात गाजलेल्या बिटकॉईन या आभासी चलनाच्या (क्रिप्टोकरन्सी) फसवणूक प्रकरणात मदतीसाठी घेतलेल्या दोघा सायबरतज्ज्ञांनाच पुणे सायबर पोलिसांनी अटक केली होती. त्यामध्ये स्वेच्छानिवृत्ती घेऊन कंपनी सुरू केलेल्या एका आयपीएस अधिकार्‍याचा समावेश होता. दोघेही सायबरतज्ज्ञ म्हणून पोलिसांना बिटकॉईन तपासात मदत करत होते. मात्र, तपासात शासनाची फसवणूक करत संशयास्पद कृती केल्याचे चौकशीत आढळल्यानंतर दोघांना अटक करण्यात आली. या सायबरतज्ज्ञाने स्वतःच्या नावावर 60 पेक्षा अधिक बिटकॉईन परस्पर लंपास केल्याचे समोर आले. त्याचे बाजारमूल्य 20 कोटींपेक्षा अधिक होते. त्या वेळी एक आरोपी पोलिस आयुक्तालयातील बड्या अधिकार्‍याच्या गळ्यातील ताईत होता. तेव्हा पोलिस आयुक्तालयात सायबर सेलमध्ये त्याचाच शब्द अंतिम होता, असे सूत्रांनी सांगितले.

बिटकॉईनमध्ये आकर्षक परतावा देण्याचे प्रलोभन दाखवत अमित व विवेक भारद्वाज या दोघांनी सुमारे साडेचारशेपेक्षा अधिक जणांना आर्थिक गंडा घातला होता. दोघांनी कोट्यवधी रुपयांची अफरातफर केली होती. याप्रकरणी पुण्यात 2018 मध्ये दत्तवाडी व निगडी पोलिस ठाण्यात दोन गुन्हे दाखल झाले. हा गुन्हा तांत्रिक असल्याने पोलिसांनी दोघांची सायबरतज्ज्ञ म्हणून नेमणूक केली. पुणे पोलिसांनी मुख्य आरोपी अमित भारव्दाजसह 17 आरोपींना अटक केली. त्याच्याकडून फक्त 241 बिटकॉईन जप्त करण्यात यश आले. राज्य आर्थिक गुन्हे शाखेच्या अप्पर पोलिस महासंचालकांकडून सप्टेंबर 2020 मध्ये या तपासाबाबत पुन्हा चौकशी करण्याचे आदेश पुणे पोलिसांच्या आर्थिक व सायबर सेलने दिले.

त्यानुसार या गुन्ह्याचा तपास पुन्हा सुरू केला. या गुन्ह्यात झालेल्या तांत्रिक तपासाचे फॉरेन्सिक ऑडिट करण्यात आले, त्या वेळी पुणे पोलिसांना अनेक संशयास्पद गोष्टी आढळून आल्या. त्यानंतर पोलिसांनी त्या दोन तज्ज्ञांना घरातून ताब्यात घेतले. बिटकॉईन प्रकरणात अटक केलेल्या आरोपींकडून जप्त केलेला डाटा हा विश्वासाने या दोघांकडे दिला होता. परंतु, त्यांनी या डेटाचा गैरफायदा घेतला. त्यातील एका तज्ज्ञाने आरोपीच्या वॉलेटमधील बिटकॉईन स्वत:च्या वॉलेटमध्ये वर्ग करून घेतल्याचे आढळून आले. तपासामध्ये त्याने 60 पेक्षा जास्त बिटकॉईन स्वतःच्या वॉलेटमध्ये वर्ग करून घेतल्याचे दिसले.

तसेच, इतर साथीदारांच्या वॉलेटवरही बिटकॉईन वर्ग केल्याचे आढळून आले. जप्ती, पंचनामे करताना आरोपींच्या वॉलेटमधील ब्लॉकचेनचे स्क्रीनशॉट बनावटीकरण केले असल्याचे तपासात निष्पन्न झाले. हे बनावट स्क्रीनशॉट खरे असल्याचे भासवून तपासासाठी सादर केल्याचे समोर आले. त्यामुळे खोलात जाऊन तपास करून चोरांवरील मोर शोधूनदेखील या अधिकारी-कर्मचार्‍यांना चौकशीच्या फेर्‍यात उभे केले जात असल्यामुळे चर्चेला उधाण आले आहे.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news