Sugar  Pudhari
पुणे

India Sugar Export Quota: साखर निर्यात कोटा पाच लाख टनांनी वाढला; दर स्थिरावण्याची शक्यता

केंद्राच्या निर्णयाने साखर उद्योगाला दिलासा; बाजारात तेजीची हवा

पुढारी वृत्तसेवा

पुणे: केंद्र सरकारने यापूर्वीच 15 लाख मे. टन साखर निर्यातीस परवानगी दिली असून, आता नव्याने सुमारे पाच लाख मे. टन साखर निर्यातीची घोषणा केली आहे. त्यामुळे साखर दरातील घसरणीस बेक लागून वाढलेले दर आता स्थिरावतील, असा अंदाज साखर वर्तुळातून व्यक्त होत आहे. शिवाय केंद्राने साखर निर्यात कोटा वाढविण्याची मागणी पूर्ण केल्यामुळेही उद्योगास दिलासा मिळाल्याचे सांगण्यात आले.

देशात यंदाच्या 2025-26 च्या हंगामात साखरेचे उत्पादन चांगले हाती येऊन शिलकी साखरसाठा मुबलक राहण्याची अपेक्षा हंगामाच्या सुरुवातीपासूनच वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे साखर निर्यात कोटा वाढविण्याची मागणी सातत्याने साखर उद्योगातून करण्यात येत होती. ती मान्य झाल्यामुळे बाजाराची मनोवृत्ती बदलण्यास मदत होणार आहे. मध्यंतरी ऊस गाळप हंगाम जोरात सुरू झाल्यानंतर आणि विशेषतः नवीन साखर बाजारात आल्यानंतर दर घसरले होते. त्यामध्ये आता दर स्थिरावण्याचा अंदाज व्यापाऱ्यांकडून वर्तविण्यात आला.

एकीकडे साखरेची किमान विक्री किंमत (एमएसपी) प्रतिक्विंटलला 3100 रुपये कायम असताना यामध्ये सतत मागणी करूनही केंद्र सरकारकडून कोणतीच दरवाढ केली जात नाही. त्यामुळे उद्योगातून नाराजीचा सूर कायम आहे. तर, मध्यंतरी दुसरीकडे उसाच्या एफआरपीची रक्कम देण्यासाठी कारखान्यांना साखरेचे दर घसरल्यामुळे कसरत करावी लागली होती. या पार्श्वभूमीवर निर्यातीसाठी पाच लाख मे. टनाइतका वाढीव साखरेचा कोटा घोषित केल्यामुळे साखर उद्योगातून या निर्णयाचे स्वागत केले जात आहे.

सटोडियांकडून साखर बाजाराला तेजीची हवा

निर्यातीचा कोटा घोषित केल्यानंतर साखरेच्या व्यापारात सटोडियांची सक्रियता वाढल्याची माहिती घाऊक बाजारपेठेतून देण्यात आली. त्यामुळे साखरेचे दर सुरुवातीस क्विंटलला 15 ते 20 रुपयांनी अल्प दरवाढीकडे वळले होते. मात्र, घाऊक बाजारात सध्या साखरेला मागणी कमी आहे. त्यामुळे वाढीऐवजी साखरेचे दर आता स्थिरावल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली.

बाजारात तेजीची हवा भरण्याचे काम सटोडियांकडून यापुढेही कायम राहण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे कारखान्यांवर साखरेच्या निविदा क्विंटलला 3700 ते 3725 रुपयांवर जात आहेत. तर, प्रत्यक्षात घाऊक बाजारात एस् 30 ग््रेाड साखरेचा क्विंटलचा दर 4000 ते 4025 रुपयांवर स्थिर असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT