Rice Pudhari
पुणे

India Rice Export 2026: भारतीय तांदळाच्या निर्यातीला झेप; सहामाहीत ५ टक्क्यांची वाढ

जानेवारी-जूनमध्ये १२.२७ दशलक्ष टन तांदूळ निर्यात; बिगर बासमतीला वाढती मागणी, मात्र मालवाहतुकीचा खर्च आणि कंटेनर टंचाईचे आव्हान

पुढारी वृत्तसेवा

पुणे: बिगर बासमती तांदळाला जागतिक बाजारपेठेत वाढलेली मागणी आणि स्पर्धात्मक दर, यामुळे भारताच्या तांदळाच्या निर्यातीत चालू वर्षाच्या पहिल्या सहामाहीत पाच टक्क्यांची वाढ झाली आहे. जानेवारी ते जून २०२६ या कालावधीत भारताने १२.२७ दशलक्ष टन तांदूळ निर्यात केला असून, गेल्या वर्षी याच कालावधीत ही निर्यात ११.६८ दशलक्ष टन होती.

जागतिक स्तरावरील भूराजकीय तणाव, पश्चिम आशियातील संघर्ष आणि आंतरराष्ट्रीय व्यापारातील अनिश्चितता असूनही भारताने तांदूळ निर्यातीतील आपले वर्चस्व कायम राखले आहे. जागतिक तांदूळ निर्यातीपैकी सुमारे ४० टक्के निर्यात भारतातून होत असून, थायलंडसह व्हिएतनाम आणि पाकिस्तान या प्रमुख प्रतिस्पर्धी देशांच्या तुलनेत भारतीय तांदळाचे दर कमी असल्याने निर्यातीला चालना मिळाल्याचे निर्यात क्षेत्रातील जाणकारांचे मत आहे.

"बिगर बासमती तांदळाच्या वाढत्या मागणीमुळे भारताची निर्यात वाढली असली, तरी मालवाहतुकीचा वाढलेला खर्च आणि कार्गो कंटेनरची कमतरता, ही सध्या सर्वांत मोठी समस्या आहे. सरकारने तातडीने कार्गो उपलब्ध करून देण्याबरोबरच वाहतूक खर्च कमी करण्यासाठी उपाययोजना केल्या नाहीत, तर पुढील काही महिन्यांत निर्यातीवर विपरीत परिणाम होऊ शकतो. त्यामुळे परकीय चलनाचे उत्पन्न आणि या क्षेत्राशी निगडित रोजगारालाही फटका बसण्याची शक्यता आहे," असे जयराज ग्रुपचे निर्यातदार धवल शहा यांनी सांगितले.

गेल्या हंगामात देशात अपेक्षेपेक्षा अधिक तांदूळ उत्पादन झाल्याने देशांतर्गत गरज भागवून अतिरिक्त साठा निर्यातीसाठी उपलब्ध झाला. विशेषतः बिगर बासमती तांदळाच्या निर्यातीत ९ टक्क्यांची वाढ झाली असून, बांगलादेशसह श्रीलंका, कॅमेरून तसेच आफ्रिकेतील अनेक देशांकडून मागणी वाढल्याचा फायदा भारतीय निर्यातदारांना झाला, असे राजेश शहा यांनी सांगितले.

दुसरीकडे, बासमती तांदळाच्या निर्यातीत मात्र पाच टक्क्यांची घट झाली आहे. या सहा महिन्यांत ३.७ दशलक्ष टन बासमती तांदूळ निर्यात करण्यात आला. पश्चिम आशियातील युद्धजन्य परिस्थितीमुळे सौदी अरेबिया, इराणसह प्रमुख बाजारपेठांमधील मागणी कमी झाल्याने ही घट झाल्याचे सांगितले जाते. मात्र, जुलैपासून निर्यातदारांसमोर नवीन अडचणी निर्माण झाल्या आहेत. समुद्री मालवाहतुकीचे दर मोठ्या प्रमाणात वाढले असून, कार्गो कंटेनरची टंचाई जाणवत आहे. काही महिन्यांपूर्वी एका शिपमेंटसाठी १,५०० ते २,००० डॉलर इतका खर्च येत होता. तो आता ७,००० ते ७,५०० डॉलरपर्यंत पोहचल्याने परदेशी खरेदीदारांकडून नव्या ऑर्डर कमी होत असल्याचे चित्र आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT