पुणे: परदेशात वास्तव्यास असलेल्या आपल्या नातेवाईक, मित्रमंडळी आणि मुलांना दिवाळीनिमित्त घरगुती फराळ सहज आणि सुरक्षितपणे पाठविता यावा, यासाठी भारतीय टपाल विभागाने यंदा मोठी तयारी सुरू केली आहे. रक्षाबंधनापासूनच दिवाळी फराळ बुकिंगची पूर्वतयारी सुरू करण्यात येणार असून, प्रथमच 'डोअरस्टेप पार्सल कलेक्शन' सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
पुणे शहर व जिल्ह्यातून दर वर्षी हजारो पार्सल्सच्या माध्यमातून दिवाळी फराळ परदेशात पाठविला जातो. अमेरिकेसह कॅनडा, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, ब्रिटन, जर्मनी, फ्रान्स, सिंगापूर, जपान, संयुक्त अरब अमिरातीसह अनेक देशांमध्ये महाराष्ट्रातील चकली, करंजी, लाडू, शंकरपाळे, चिवडा, अनारसे आदी पारंपरिक पदार्थ मोठ्या प्रमाणावर पाठविले जातात.
गेल्या काही वर्षांपर्यंत ही सेवा प्रामुख्याने काही युरोपीय देशांपुरती मर्यादित होती. मात्र, आता टपाल विभागाच्या प्रयत्नांमुळे ही सुविधा जगातील सुमारे १२५ देशांपर्यंत विस्तारली आहे. पूर्वी दिवाळी अगदी जवळ आल्यानंतरच फराळ बुकिंगला सुरुवात होत असे. त्यामुळे शेवटच्या क्षणी टपाल कार्यालयांमध्ये मोठी गर्दी होत होती. पार्सल बुक करण्यासाठी नागरिकांना तासन्तास रांगेत उभे राहावे लागत होते.
डोअरस्टेप कलेक्शन ही यंदाची सर्वांत मोठी सुविधा ठरणार आहे. नागरिकांनी टपाल विभागाने जाहीर केलेल्या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधून किंवा बुकिंग करून दिल्यानंतर संबंधित पोस्ट कर्मचारी निश्चित वेळेनुसार घरी येऊन पार्सल स्वीकारतील. पार्सलचे वजन, आवश्यक कागदपत्रे, पॅकिंग आणि शुल्काबाबतही जागेवरच मार्गदर्शन केले जाणार आहे. त्यामुळे ज्येष्ठ नागरिक, नोकरदार, व्यावसायिक तसेच महिलांना मोठा दिलासा मिळणार आहे.
परदेशात खाद्यपदार्थ पाठविताना संबंधित देशांचे आयात नियम, पॅकिंगचे निकष आणि सीमाशुल्क नियम पाळणे आवश्यक असते. त्यामुळे फराळ हवाबंद, सुरक्षित आणि योग्य पद्धतीने पॅक करण्याचे आवाहन टपाल विभागाने केले आहे. आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून अधिकृत प्रक्रियेद्वारे पाठविण्यात येणारी पार्सल्स अधिक सुरक्षित आणि वेळेत पोहोचतात, असे विभागातील अधिकार्यांनी सांगितले.
दिवाळीच्या काळात पुणे टपाल विभागाकडे फराळाच्या पार्सल्सची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने यंदा अतिरिक्त मनुष्यबळ, स्वतंत्र काउंटर, जलद बुकिंग व्यवस्था आणि डोअरस्टेप सेवा यांचे नियोजन करण्यात येत आहे.