आशिष देशमुख
पुणे: मान्सून हंगाम मध्यावर आलेला असताना देशाच्या ४३ टक्के भू-भागावर कमी, तर १७ टक्के भागात खूप कमी पाऊस झाला आहे. सरासरीत केवळ गुजरात, ओडिशा आणि महाराष्ट्र ही तीनच राज्ये काठावर पास झाली आहेत. उर्वरित राज्यावर मात्र अल-निनोचा मोठा प्रभाव दिसून आला आहे. पंजाब, चंदीगड, राजस्थान, उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, आसाम, मेघालय, अरुणाचल प्रदेश, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, केरळ या १५ राज्यांसह लक्षद्वीप बेट अवर्षणग्रस्त (रेड झोनमध्ये) गणली गेली आहेत.
यंदा मान्सून हंगामातील ६५ दिवसांत देशात सरासरी ११ टक्के पावसाची तूट आहे. मात्र, विभागवार हा आकडा काढला असता त्याची दाहकता जास्त जाणवते. यात ईशान्य भारत सर्वाधिक २६, दक्षिण भारत १८ तर उत्तर भारतात १० टक्के तूट आहे. मध्य भारतात सरासरी इतका म्हणजे शून्य टक्के तुटीचा पाऊस झाल्यामुळे देशाच्या सरासरीत भर पडली आहे. मात्र, राज्यवार पडलेल्या पावसाचा ताळेबंद मांडला तर तब्बल १५ राज्ये अवर्षणग्रस्त म्हणजे रेड झोनमध्ये गेली आहेत; तर उर्वरित राज्यात साधारण पाऊस झाला आहे. गुजरात, ओडिशा आणि महाराष्ट्रातच मान्सून अनपेक्षितपणे बरसला. त्याचा अंदाज हवामान विभागालाही देता आला नाही.
ऑगस्ट-सप्टेंबरमध्येही कमी पाऊस
यंदा हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, देशात १ जून ते ८ ऑगस्ट या ६५ दिवसांच्या मान्सून हंगामात खूप कमी पाऊस झाला आहे. गुजरात, महाराष्ट्र ही राज्ये वगळता कोणत्याही राज्याने सरासरी गाठलेली नाही. ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्येही देशात सरासरीच्या ९० ते ९४ टक्के पावसाचा अंदाज आहे.
सर्वात कमी पावसाची राज्ये : मेघालय : ५७ %, अरुणाचल प्रदेश : ३७%, बिहार : ३५%, गोवा ३५ %, पंजाब : ३४%, आंध्र प्रदेश : ३४%, मणिपूर : ३७%, उत्तर प्रदेश : २६%, चंदीगड : २६%, झारखंड : २५ %, लक्षद्वीप : २४%, आसाम : २३%, मध्य प्रदेश : २०%, कर्नाटक : २० %, केरळ : २१%
सरासरीपेक्षा जास्त पाऊस : दादरा-नगरहवेलीः ७२ %, ओडिशा २४%, गुजरात : १०%, महाराष्ट्रः २%,जम्मू कश्मीर, लद्दाखः ११%, दिल्लीः ६%, अंदमान-निकोबार ८%
अल निनोमुळे ८० टक्के कमी पाऊस
आयएमडीचे महासंचालक डॉ. मृत्युंजय महापात्रा यांनी सांगितले की, अल-निनोचा प्रभाव यंदाच्या मान्सूनवर राहिला असून, जूनमध्ये देशात ८० टक्के कमी पाऊस झाला. तर, जुलैमध्ये २४ कमी दाबाचे पट्टे तयार झाल्याने गुजरात, महाराष्ट्र आणि ओडिशा राज्यात चांगला पाऊस झाला. उर्वरित भागात मात्र २० ते ४३ टक्के कमी पाऊस झाला आहे. ऑगस्ट- सप्टेंबरमध्येही सरासरीपेक्षा कमीच म्हणजे ९० ते ९४ टक्के इतका अंदाज आम्ही दिला आहे.
महाराष्ट्रातील घाटमाथा देशात अव्वल
सर्वाधिक पर्जन्यमानात सदैव पुढे असणाऱ्या चेरापुंजी, मौसिनरामला खूप मागे टाकले
भिरा ७,९४४, ताम्हिणी ७,२७१, महाबळेश्वर ६,२०० मिमी.
मेघालयातील चेरापुंजी २,५००, मौसिनराम येथे केवळ २,८०० मिमी. पावसाची नोंद