पुणे

पर्याय देण्यासाठी इंडिया आघाडी भक्कम : शरद पवार यांचा दावा

Laxman Dhenge

नारायणगाव : पुढारी वृत्तसेवा : देशाला पर्याय देण्यासाठी इंडिया आघाडी भक्कमपणे एकत्र आली आहे. महाविकास आघाडीच्या वतीने लढवल्या जाणाऱ्या जागांसंदर्भात आमची एकत्रित चर्चा झाल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली. विघ्नहर सहकारी साखर कारखान्यावर एका कार्यक्रमानिमित्त आले असता पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला.

पवार म्हणाले, दिल्ली येथे शनिवारी (दि. १३) मलिकार्जुन खर्गे यांच्या अध्यक्षतेखाली इंडिया आघाडीची बैठक पार पडली. या बैठकीला सोनिया गांधी, राहुल गांधी आदींसह इंडिया आघाडीचे सर्वच नेते उपस्थित होते. मला विघ्नहर कारखान्यावर कार्यक्रम असल्यामुळे मी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे या बैठकीमध्ये सहभागी झाल्याचे खा. पवार यांनी सांगितले.

इंडिया आघाडीचे प्रमुखपद मल्लिकार्जुन खर्गे यांनी घ्यावे तसेच आपण सगळ्यांनी एका विचाराने लोकसभा निवडणुकीला सामोरे जावे अशी चर्चा या बैठकीमध्ये झाल्याचे सांगत इंडिया आघाडी लोकसभा निवडणुकी संदर्भात जागा वाटपाचा निर्णय लवकरात लवकर घेणार आहे. ज्या ठिकाणी वाद असेल त्या ठिकाणी एक-दोन लोकांनी एकत्र बसून मार्ग काढावा, असे या बैठकीमध्ये ठरल्याचे खा. पवार यांनी सांगितले. देशामध्ये इंडिया आघाडी चांगल्या प्रकारे पर्याय देऊ शकते याबाबत आमचे सगळ्यांचे एकमत झाला आहे.

आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये कोणाचा तरी एकाचा चेहरा पुढे करून मत मागण्याची गरज नाही. आगामी काळामध्ये व्यूहरचना करण्यासाठी एक कमिटी गठीत करावी, असे या बैठकीत ठरल्याचे त्यांनी सांगितले. सध्याचे केंद्र सरकारचे धोरण ज्या मंडळींना मान्य नाही, असे सगळे पक्ष एकत्र आले आहेत. इंडिया आघाडीमध्ये कोणत्याही प्रकारची कोणत्याही पक्षाची नाराजी नाही असेही यावेळी खा. शरद पवार यांनी पत्रकारांना सांगितले. या पत्रकार परिषदेला माजी मंत्री तसेच काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात, खा. डॉ. अमोल कोल्हे, विघ्नहरचे अध्यक्ष सत्यशील शेरकर आणि जुन्नरचे आमदार अतुल बेनके उपस्थित होते.

 सन १९७७ ला होती अशीच परिस्थिती

सन १९७७ मध्ये देखील अशीच परिस्थिती निर्माण झाली होती. विरोधकांनी एकत्र येऊन त्यांनी सत्ता मिळवली आणि ऐनवेळी मोरारजी देसाई यांना सगळ्यांच्या विचाराने पंतप्रधान केले गेले. आताही तशीच परिस्थिती असून नरेंद्र मोदी यांना पर्याय म्हणून इंडिया आघाडी सक्षमपणे काम करीत आहे. देशांमध्ये इंडिया आघाडीचे सरकार येईल, अशी खात्री यावेळी खा. शरद पवार यांनी व्यक्त केली.

शेतकऱ्यांच्या भावनांचा आदर नाही

पंतप्रधान नरेंद्र मोदी नाशिक या ठिकाणी आल्यावर शेतकऱ्यांसंदर्भात काही चांगले निर्णय घेतील अशी आम्हाला अपेक्षा नव्हती. मोदी आपल्या संदर्भामध्ये काहीतरी धोरणात्मक योग्य निर्णय घेतील, असे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना वाटत होते. परंतु पंतप्रधान मोदी यांनी तसे काही केलं नाही. नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रात येऊन शेतकऱ्यांच्या भावनांचा आदर केला असं मात्र आम्हाला कुठे दिसले नाही, असेही यावेळी खा. पवार यांनी सांगितले.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT