पुणे: महापालिका निवडणुकीत पक्षाचे तिकीट न मिळालेल्या अनेक इच्छुकांनी थेट बंडखोरीचा मार्ग स्वीकारत अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत अपक्ष उमेदवारांची संख्या लक्षणीय प्रमाणात वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
राज्य निवडणूक आयोगाने अपक्ष उमेदवारांसाठी तब्बल 191 चिन्हे उपलब्ध करून दिली असून, त्यामध्ये भाजीपाला, फळे आणि दैनंदिन वापरातील विविध वस्तूंचा समावेश आहे. राष्ट्रीय स्तरावरील पाच, राज्यस्तरीय पाच आणि इतर राज्यांतील नऊ पक्षांची चिन्हे राखीव ठेवण्यात आली आहेत.
या राखीव चिन्हांनंतर अपक्षांना उपलब्ध असलेल्या 191 मुक्त चिन्हांपैकी पसंतीची तीन चिन्हे नमूद करून अर्जातच मागणी करावी लागते. या चिन्हांचे वाटप 3 जानेवारी रोजी होणार आहे. अपक्ष उमेदवारांसमोर आपले चिन्ह मतदारांपर्यंत स्पष्टपणे पोहचविण्याचे मोठे आव्हान असते.
त्यामुळे लोकांना ओळखीची वाटणारी, रोजच्या जीवनात दिसणारी चिन्हे निवडण्याला प्राधान्य दिले जाते. यामध्ये टीव्ही, रिक्षा, बॅट, लॅपटॉप, कंगवा, चावी, फुटबॉल, टेबल, दुर्बीण यांसारखी चिन्हे आहेत. त्याचबरोबर सफरचंद, नारळ, ऊस, कलिंगड, द्राक्ष, फणस, भेंडी, मका, भुईमूग, बिस्कीट, पाव, केक आणि जेवणाची थाळी अशी अनेक चिन्हे देखील उपलब्ध आहेत.
अपक्ष उमेदवारांसह अमान्यताप्राप्त पक्षांचे उमेदवार या मुक्त चिन्हांमधून चिन्हाची निवड करू शकतात. संपूर्ण प्रक्रिया निवडणूक आयोगाच्या नियमांनुसार पारदर्शक पद्धतीने राबवली जाणार आहे. तर, मान्यताप्राप्त पक्षांना त्यांच्या राखीव चिन्हांवरच उमेदवार उभे करण्याची परवानगी राहील आणि त्यांना मुक्त चिन्हांची यादी लागू होणार नाही.