जावेद मुलाणी
इंदापूर: जिल्हा परिषदेत ‘वजनदार’ खुर्चीची चाहूल लागताच इंदापूरच्या राजकारणात नव्या समीकरणांची कुजबुज सुरू झाली आहे. कृषिमंत्री दत्तात्रय भरणे, माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील आणि जिल्हा बँकेचे संचालक आप्पासाहेब जगदाळे हे तिघेही दिवंगत अजित पवार यांच्या शब्दाखातर ‘घड्याळ’ चिन्हावर एकत्र आले आणि तालुक्याने राष्ट्रवादीला विक्रमी कौल दिला. मात्र, या एकजुटीच्या आड भविष्यातील विधानसभेच्या राजकारणाची धग दडलेली असल्याची चर्चा आता उघडपणे रंगू लागली आहे.
जिल्हा परिषदेच्या आठही जागा आणि पंचायत समितीच्या सोळाही जागांवर राष्ट्रवादी काँग््रेासचा झेंडा फडकला. दहा हजारांहून अधिक मताधिक्याने विजयी झालेल्या सदस्यांनी तालुक्याचा राजकीय चेहरामोहरा बदलून टाकला. हा कौल केवळ निवडणुकीपुरता नसून ‘वकास प्रथम’ या मंत्रावर दिलेला ठाम विश्वास असल्याचे चित्र उभे राहिले. पुणे जिल्हा परिषदेची सत्ता एकहाती स्थापनेच्या दिशेने पक्षाच्या हालचालींना वेग आला आहे.
राजकारणात प्रत्येक विजय नवे प्रश्न घेऊन येतो. जिल्हा परिषदेत इंदापूरच्या वाट्याला येणाऱ्या महत्त्वाच्या सभापतिपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार? हा पहिला प्रश्न. त्याचवेळी विधानपरिषद किंवा आगामी विधानसभेसाठी बलदंड उमेदवारीची गणिते कोणाच्या बाजूने झुकणार, हे दुसरे कारण. भरणे, पाटील आणि जगदाळे हे तिन्ही नेते भविष्यातील विधानसभेचे दावेदार मानले जातात. या तिघांच्या कार्यकर्त्यांनी मागील काही वर्षांपासूनच स्वतंत्र बळ उभे करण्याची तयारी सुरू ठेवली आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेत मिळणारी ‘वजनदार’ जबाबदारी ही केवळ सत्तेची नव्हे, तर भविष्यातील राजकीय स्थानाची पायाभरणी ठरणार आहे.
राजकीय जाणकारांच्या मते, राष्ट्रवादी काँग््रेाससमोर आता सर्वांत मोठे आव्हान म्हणजे या तिन्ही शक्तिकेंद्रांमध्ये संतुलन राखण्याचे. योग्य वेळी परिपक्व निर्णय न घेतल्यास आजची एकजूट उद्याच्या स्पर्धेत तडे जाऊ शकतात. अजितदादांच्या शब्दाने उभी राहिलेली ही आघाडी चिरकाल टिकवायची असेल, तर जिल्हा परिषद व विधानपरिषद-विधानसभा या दोन्ही पातळ्यांवर अचूक राजकीय गणित मांडावे लागेल.
सध्यातरी इंदापूर तालुका राष्ट्रवादीमय झाला आहे; मात्र पुढील काही महिन्यांत ’खुर्ची’ आणि ’उमेदवारी’ या दोन केंद्रबिंदूंवरच तालुक्याचे राजकारण फिरणार, हे स्पष्ट संकेत आहेत. विकासाच्या मुद्द्यावर एकत्र आलेली ही तिकडी आगामी काळातही एकदिलाने पुढे जाते की राजकीय स्पर्धेची नवी शर्यत सुरू होते, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.