Water Crisis Pudhari
पुणे

Indapur Water Crisis: इंदापूरमध्ये पाणीटंचाई तीव्र; शेतकऱ्यांचा राजकीय नेत्यांवर संताप

उजनी व खडकवासला कालव्याचे पाणी न मिळाल्याने शेतकरी आक्रमक; आंदोलनाचा इशारा

पुढारी वृत्तसेवा

भिगवण: इंदापूर तालुक्यातील पाण्याचा प्रश्न दिवसेंदिवस उग््रा बनत चालला असून, शेतकऱ्यांची सहनशीलता आता पूर्णपणे संपली आहे. उन्हाळ्यात तालुक्याला उजनी आणि खडकवासला कालव्याचे हक्काचे पाणी मिळत नसल्याने, ‌‘हे पाणी नेमके मुरतेय कुठे?‌’ असा संतप्त सवाल शेतकरी विचारत आहेत. पूर्वी पाणीदार असणारा इंदापूर तालुक्याचे आता वाळवंटी भागात रुपांतर होत आहे.

त्यामुळे पाणी प्रश्नावरून आता तालुक्यातील राजकीय नेते थेट शेतकऱ्यांच्या निशाण्यावर आले आहेत. त्यामुळे मामा, भाऊ, भैय्या, दादा आता तरी तालुक्यातील शेतकऱ्यांची नस ओळखा; अन्यथा शेतकऱ्यांच्या आंदोलनाची धार तुम्हाला स्वस्थ बसू देणार नाही, हे नक्की. पूर्वी हा तालुका नगदी पिके आणि भाजीपाला उत्पादनात आघाडीवर होता. तालुक्याचा अर्धा भाग खडकवासला कालव्यावर, तर उर्वरित भाग उजनी धरणाच्या पाण्यावर अवलंबून होता. गेल्या दहा वर्षांपर्यंत येथील शेतकरी सुखी होता.

मात्र, त्यानंतर उजनीच्या पाण्याचा वापर इतरत्र वाढल्याने तालुक्याला मोठा फटका बसला. खडकवासला कालव्याच्या पाण्यालाही राजकीय दृष्टी लागल्याने हे पाणी राजकीय सोयीनुसार वाहू लागले आहे आणि त्यात इंदापूर तालुका भरडला जात आहे. पाण्यासाठी आता शेतकरी पुण्यात जलसंपदा विभागाच्या कार्यालयावर धडका मारत असून, रस्त्यावर उतरू लागला आहे. वेळीच न्याय मिळाला नाही, तर या आंदोलनाची धार राजकीय नेत्यांना स्वस्थ बसू देणार नाही, असा स्पष्ट इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.

जलसंपदा विभागाचा कागदी घोळ!

जलसंपदा विभागाच्या कागदावर इंदापूर तालुक्याला सर्वाधिक पाणी दिल्याचे दाखवले जाते; त्याखालोखाल दौंड आणि हवेली तालुक्यांचा क्रमांक लागतो. मात्र, प्रत्यक्षात परिस्थिती उलटी आहे. शेजारील दौंड, बारामती आणि हवेली तालुक्यांना पुरेसे पाणी मिळत असताना इंदापूर तालुका मात्र कोरडाठाक राहतो आहे. कागदावर पाणी असूनही प्रत्यक्षात शेतकरी पाण्यासाठी आसुसलेला आहे, या दुजाभावामुळेच तरुण शेतकऱ्यांमध्ये तीव असंतोष आहे.

नेते एकत्र; मग न्याय का नाही?

तालुक्यात पाण्याचा प्रश्न गंभीर होत असतानाच यावर नेहमी राजकीय आरोप-प्रत्यारोप होत राहिले. आता तर तालुक्यातील प्रमुख नेते एकत्र आले आहेत. तालुक्यातील नेते, ‌’दादा‌’, ‌’भैय्या‌’, ‌’मामा‌’ आणि ‌’भाऊ‌’ या सर्वांनी आपली राजकीय ताकद पणाला लावली तर हा प्रश्न चुटकीसरशी सुटू शकतो. मग तरीही तालुक्याला न्याय का मिळत नाही? असा सवाल सामान्य शेतकरी विचारत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT