Nira Canal Pudhari
पुणे

Indapur Khadakwasla Canal Water Issue: इंदापूरमध्ये कालव्याच्या पाण्यावरून संताप; खडकवासला पट्ट्यातील शेतकरी आक्रमक

निरा डावा कालव्याला बारमाही पाणी तर खडकवासला कालव्याला पिण्याचेही पाणी नाही; शेतकऱ्यांकडून दुजाभावाचा आरोप

पुढारी वृत्तसेवा

शत्रुघ्न ओमासे

कळस: इंदापूर तालुक्यात एकीकडे निरा डावा कालव्याला वर्षभर पाणी उपलब्ध होत असताना, दुसरीकडे खडकवासला कालव्याला पिण्यापुरते देखील पाणी मिळत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव संताप व्यक्त होत आहे. महत्त्वाचे म्हणजे निरा डावा कालव्यावर तालुक्यातील बहुतांश नेत्यांची शेती अवलंबून असल्याने हा दुजाभाव होत असल्याचा आरोप शेतकरी करीत आहेत. पाण्याच्या या असमान वाटपामुळे तालुक्यातील शेतकरी प्रशासनाविरोधात आक्रमक झाले आहेत.

इंदापूर तालुक्यातील कुठल्याही बड्या नेत्याची शेती खडकवासला कालव्यावर अवलंबून नसल्यामुळेच या कालव्याला पाणी येत नसल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे. दुसरीकडे, इंदापूर तालुक्यातील बहुतांश नेत्यांची शेती निरा डावा कालव्यावर आहे. त्यामुळे सुरुवातीपासून गेल्या दीड महिन्यापासून चाललेल्या आंदोलनात इंदापूर तालुक्यातील कुठल्याच बड्या नेत्याने सहभाग दर्शविला नाही.

त्यामुळेच खडकवासला कालव्याच्या पाण्याकडे दुर्लक्ष केल्याचे शेतकरी बोलून दाखवत आहेत. सिंचन भवन येथे झालेल्या शेवटच्या आंदोलनात सर्वच राजकीय पक्षांनी भाग घेतला. परंतु, त्या आंदोलनांमध्ये देखील तत्काळ पाणी हा निर्णय न झाल्यामुळे शेतकरीवर्गातून तीव नाराजी निर्माण झाली आहे. सुरुवातीपासूनच आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहण्याची गरज होती. परंतु, त्याकडे दुर्लक्ष झाल्याने शेतकरी पाण्यापासून वंचित राहिल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.

इंदापूर तालुक्यामध्ये खडकवासला कालव्याच्या पट्‌‍ट्यातील शेती ही वाळवंट झाल्याशिवाय राहणार नाही, असे जाणकार शेतकरी बोलत आहेत. पाणी सोडण्याबाबत कुठलाच ठोस निर्णय झाला नसल्यामुळेच शेतकऱ्यांच्या कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. विधानसभा निवडणुका आल्यानंतरच इंदापूर तालुक्यातील नेते हे उजनी धरणातून शेटफळगढेला खडकवासला कालव्यातून पाणी सोडण्याचे नुसते आश्वासन देत असतात. परंतु, पाच वर्षे त्याकडे बघतसुद्धा नाहीत, असा शेतकऱ्यांचा आरोप आहे.

प्रमुख मुद्दे:

  • इंदापूर तालुक्यात दोन प्रमुख कालवे असून, त्यामध्ये निरा डावा कालवा आणि खडकवासला कालव्याचा समावेश आहे.

  • निरा डावा कालव्याला बारमाही पाणीपुरवठा सुरू असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.

  • खडकवासला कालव्याच्या शेवटच्या टोकावरील गावांना पिण्याचे पाणीही उपलब्ध होत नसल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.

  • कालवा आवर्तन वेळेवर न मिळाल्याने ऊस, डाळिंब, द्राक्ष भाजीपाला ही पिके जळून जात आहेत.

  • विहिरी आणि कूपनलिकांचे पाणी पूर्णतः आटल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत.

  • जनावरे, पक्षी आणि जलचरांनाही पाण्याअभावी मोठा फटका बसत आहे.

  • काही भागांमध्ये नागरिकांना टँकरवर अवलंबून राहावे लागत असून, पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.

  • एकाच तालुक्यात दोन वेगवेगळे न्याय का? असा सवाल शेतकऱ्यांकडून उपस्थित केला जात आहे.

  • प्रशासनाने तातडीने सर्व भागांना समान न्याय देऊन नियोजनबद्ध पाणीवाटप करावे, अशी मागणी जोर धरत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT