इंदापुरात द्राक्ष उत्पादनात ५० टक्क्यांपर्यंत घट Pudhari
पुणे

Indapur Grape Production: इंदापुरात द्राक्ष उत्पादनात ५० टक्क्यांपर्यंत घट; अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांत चिंतेचे वातावरण

दमट हवामान, पाण्याचा साठा आणि घडकुजीमुळे उत्पादनावर परिणाम; तज्ज्ञांनी दिला इशारा

पुढारी वृत्तसेवा

कळस : द्राक्ष पिकाचे आगार समजल्या जाणाऱ्या इंदापूर तालुक्यातील अतिरिक्त पावसामुळे द्राक्षाचे उत्पादन घटण्याची भीती वाढल्याने शेतकरी वर्गामध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. अतिरिक्त पाऊस पडल्यामुळे द्राक्षांच्या मुळावरती परिणाम झाला आहे. त्यामुळे घड लागण्यात अनेक अडथळे निर्माण होत आहेत.(Latest Pune News)

परिणामी 40 ते 50 टक्क्यांपर्यंत उत्पादनात घट होण्याची भीती शेतकरी व्यक्त करत आहेत. येथे मे महिन्यापासून पाऊस पडला. या अतिपावसामुळे द्राक्ष पिकावर रोगाचे प्रमाण वाढले. पावसाळी वातावरणामुळे उन्हाचा अभाव राहिला. त्यामुळे द्राक्षाची काडी तयार झाली नाही. काडी तयार होण्यासाठी 60 ते 90 दिवस कोरडे हवामान लागते. मात्र, तसे वातावरण निर्मिती झाली नाही.

यासह अनेक ठिकाणी द्राक्ष बागांमध्ये पाणी साचले होते. त्यामुळे पांढरी मुळी तयार झाली नाही. त्याचा थेट परिणाम घड निघण्यावर झाला आहे. त्यातच पावसामुळे औषधांचा खर्चही वाढला असून शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे.

सततच्या दमट हवामानामुळे ओल्या बुरशीजन्य रोगांचा प्रभाव वाढला आहे. आता द्राक्षांना पालाच राहिला नसल्याचे काही ठिकाणी दिसून येते. द्राक्षाच्या छाटण्या झालेल्या बागा फुलोरा अवस्थेत आहेत. मात्र त्यावर घड कुजीची समस्या दिसू लागली आहे. आता सकाळी धुके पडत असल्याने शेतकरी धास्तावला आहे.

अनेक शेतकऱ्यांच्या बागांमध्ये द्राक्षांना दहा ते वीस घड संख्या लागली आहे तर अनेक ठिकाणी द्राक्ष बागा पूर्णपणे वांझ झाल्याचे दिसत आहे. जास्त काळ पावसाळा राहिल्याने शेतकऱ्यांचा खर्च वाढला असून उत्पादन कमी निघण्याच्या भीतीने शेतकरी धास्तावला आहे.

मे महिन्यातील अवकाळी पावसामुळे द्राक्षांचे उत्पादन 40 ते 50 टक्के घटणार आहे. मे महिन्यातील अवकाळी पावसामुळे द्राक्ष काडीमध्ये गर्भधारणा झाली नाही. त्यामुळे यंदा द्राक्षाचे दर तेजीत राहण्याची शक्यता आहे.
विनोद पोंदकुले, कृषी सल्लागार
धुक्यामुळे घडकुजेचे प्रमाण वाढले आहे. घडकूज आटोक्यात येत नसल्याचे दिसत आहे. यंदा घडाची संख्या कमी असून देखील त्यावरती रोगाचे प्रमाण वाढले आहे.
विकास खारतोडे, द्राक्ष उत्पादक शेतकरी, कळस

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT