Indapur Bypass Pudhari
पुणे

Indapur Bypass: मुंबई-गोवा महामार्ग आणखी किती घेणार बळी? इंदापूर बायपासच्या कामावर प्रश्नचिन्ह; अपघातानंतर पुढचं पाऊल कधी

पाच वर्षांपूर्वीचा भराव काढून पुन्हा काम सुरू असल्याचे चित्र; विलंब, अपघात आणि कामाच्या नियोजनाबाबत नागरिकांकडून प्रश्न.

पुढारी वृत्तसेवा

विनोद सापळे

इंदापूर: मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ वरील इंदापूर बायपासचे काम नेमके कधी पूर्ण होणार, हा प्रश्न आता वाहनचालक आणि स्थानिक नागरिकांना सतावू लागला आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या या बायपासचे काम पूर्ण होऊन वाहतूक सुरळीत होईल, अशी अपेक्षा असताना प्रत्यक्षात कामातील विलंब, वारंवार बदलणारी कामाची पद्धत आणि पाच वर्षांपूर्वी करण्यात आलेला भराव काढून पुन्हा रस्त्याच्या कामासाठी वापरला जात असल्याचे दिसणारे चित्र यामुळे संबंधित यंत्रणेच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

एकीकडे महामार्गाचे काम पूर्ण होण्याची प्रतीक्षा, तर दुसरीकडे अपघाता मधील जीवितहानी, अशा दुहेरी संकटात वाहनचालक अडकले आहेत.

अवघ्या आठ दिवसांपूर्वी इंदापूर बायपास पासून सुमारे २०० मीटर अंतरावर मारुती वॅगनार कार आणि रिक्षाची धडक होऊन दोघांचा मृत्यू झाल्याच्या घटनेने महामार्गावरील सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

इंदापूर बायपासच्या कामासाठी सुमारे पाच वर्षांपूर्वी करण्यात आलेला भराव आता काढून महामार्गाच्या पुढील कामासाठी वापरला जात असल्याचे दिसत आहे. विशेषतः रेल्वे पुलाच्या बाजूला करण्यात आलेल्या भरावाबाबत नागरिकांकडून प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

हा भराव काढण्यामागील तांत्रिक कारण काय, पूर्वी केलेल्या कामात काही त्रुटी होत्या का आणि पुन्हा करण्यात येणाऱ्या कामाचा खर्च कोणत्या तरतुदीतून केला जात आहे, याबाबत संबंधित यंत्रणेने स्पष्ट माहिती देणे आवश्यक आहे. रस्ते बांधकामात तांत्रिक गरजेनुसार बदल करावे लागणे शक्य असले, तरी त्यामागील कारणे आणि कामाचा तपशील नागरिकांसमोर येणे गरजेचे आहे.

अन्यथा, एकाच कामाची वारंवार पुनरावृत्ती होत असल्याची भावना निर्माण होऊन सार्वजनिक निधीच्या वापराबाबत संशय व्यक्त केला जाणे स्वाभाविक आहे. त्यामुळे भराव काढण्या मागील तांत्रिक कारणे, कामाचा दर्जा आणि सुधारित आराखडा याबाबत पारदर्शकता ठेवण्याची मागणी जोर धरत आहे.

मुंबई-गोवा महामार्गावरील इंदापूर बायपास पूर्ण झाल्यानंतर वाहतुकीचा ताण कमी होईल आणि प्रवास अधिक सुरक्षित होईल, अशी अपेक्षा अनेक वर्षांपासून व्यक्त केली जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT