बेट भागात संततधार पावसाने शेती कामे ठप्प Pudhari
पुणे

Takli Haji Rain: बेट भागात संततधार पावसाने शेती कामे ठप्प

आठवडाभरापासून वातावरण खराब झाले आहे. गेले दोन दिवस आकाशात ढगांची गर्दी होत आहे.

पुढारी वृत्तसेवा

टाकळी हाजी: शिरूर तालुक्यातील पश्चिमेकडील बेट भागातील शेतकर्‍यांवर निसर्गाचा प्रकोप पुन्हा एकदा पहावयास मिळत आहे. आठवडाभरापासून वातावरण खराब झाले आहे. गेले दोन दिवस आकाशात ढगांची गर्दी होत आहे.

दिवसभर रिमझिम पावसाने जोर कायम ठेवला असून या संततधार पावसामुळे शेतकर्‍यांची कामे विस्कळीत झाली आहेत. तसेच आजारपणाचे प्रमाणही वाढले आहे.(Latest Pune News)

सततच्या पावसाने पालेभाज्या, फळबागांबरोबरच दूध उत्पादनावर मोठा परिणाम जाणवत आहेत. जनावरांच्या चार्‍यासाठी शेतात जाणार्‍या शेतकर्‍यांना चिखलातून वाट काढावी लागत आहे. पावसाची रिपरिप आणि वाढलेली आर्द्रता यामुळे जनावरांची काळजी घेणे कठीण झाले आहे. परिणामी दूध उत्पादनात घट झाली असून, अनेक शेतकरी पावसात भिजल्याने आजारी पडले आहेत.

टाकळी हाजी, कवठे येमाई, फाकटे, मलठण, निमगाव दुडे, रावडेवाडी, आमदाबाद, म्हसे, माळवाडी, शरदवाडी, वडनेर या भागांतील डाळिंब उत्पादक शेतकर्‍यांची स्थिती अत्यंत बिकट आहे. बागा सध्या फळ तोडणीच्या टप्प्यात असताना सततच्या पावसामुळे फळे तोडणे आणि ती बाजारात पोहोचवणे अशक्यप्राय झाले आहे.

पाऊस होतो, पण वेळेवर नाही. सध्याच्या पावसाचा शेतीवर परिणाम होत आहे. खर्च वाढतोय. उत्पादनाची खात्री नाही. आमचे आयुष्य सध्या संकटात आहे, अशी व्यथा शेतकरी वर्गातून व्यक्त होत आहे. पावसाचे चक्र थांबणार की आणखी संकट उभे करणार, हे येणार्‍या दिवसांमध्ये स्पष्ट होईल. पण, तोवर शेतकर्‍यांची धावपळ आणि संकटांचा सामना सुरूच राहणार, हे निश्चित.

डाळिंब बागांमध्ये रोगराई पसरण्याचा धोका

सततच्या पावसामुळे डाळिंब बागांमध्ये रोगराई पसरण्याचा धोका वाढला आहे. वेळेवर औषध फवारणी करणे अत्यावश्यक झाले आहे. मात्र, पावसात किंवा पावसानंतर फवारणी केली तरी पुन्हा पाऊस झाल्यास सारा खर्च वाया जातो आणि उत्पन्नाच्या आशेवर पाणी फेरले जाते. अशा स्थितीत शेतकरी आर्थिक दुर्दशेत सापडले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT