नसरापूर: पुणे-सातारा महामार्ग पहिल्याच पावसाच्या तडाख्यात जागोजागी उखडला असून, महामार्गावर खड्डेच खड्डे पडले आहेत. महामार्ग वाहतूक पोलिसांचे अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याने पुणे-सातारा महामार्गावर जागोजागी वाहतूक कोंडी होत असून, त्याचा नाहक त्रास प्रवाशांना सोसावा लागत आहे. रविवारी सुट्टीसाठी बाहेर गेलेले परतीच्या मार्गावर असतात, त्यामुळे मोठ्या वाहतूक कोंडीची शक्यता असल्याने प्रशासन गांभीर्याने कधी लक्ष देणार? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
शिवरे (ता. भोर) येथील उड्डाणपुलाचे काम कासवगतीने करणार्या ठेकेदारावर बेजबाबदार संबंधित प्रकल्प संचालकांचा कोणताच अंकुश नसल्याने पुणे- सातारा महामार्गावरील या उड्डाणपुलाचे काम कासवगतीने सुरू आहे. (Latest Pune News)
या कामाच्या ठिकाणी अपघातप्रवण क्षेत्र निर्माण झाल्याने रोजच छोटे, मोठे अपघात घडत आहेत. सेवा रस्त्यावर पडलेले खड्डे पावसाळ्यापूर्वी न बुजवल्याने दोन्ही बाजूला रोजच वाहतुकीचा खोळंबा होत आहे. सेवा रस्ते अरुंद असल्याने वाहनांच्या लांब रांगा लागत आहेत, यामुळे जेथे पाच मिनिटांत अंतर पार होणारे अंतर पार करायला आता जवळपास तास दीड तास लागत आहे.
महामार्गावर खड्डेच खड्डे पडल्याने वाहनधारकांना मोठी कसरत करावी लागत आहे. मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी वाढत आहे. सातारा बाजूला जाणार्या वाहनाच्या रांगा शिवरे, खोपी उड्डाणपूल ते टोलनाकापर्यंत लागल्या होत्या.
शनिवारी (दि. 24) सातारा बाजूला वाहनाच्या लांब रांगा लागल्या होत्या. हीच वाहने दुसर्या दिवशी रविवारी परतीच्या मार्गावर जाणार असल्याने मोठी वाहतूक कोंडी होण्याची शक्यता असल्याने याबाबत प्रशासन काय भूमिका बजावणार असा सवाल प्रवासी श्रीकांत वाल्हेकर यांनी केला आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक संजय कदम यांच्याशी संपर्क साधला असता तो होऊ शकला नाही.
महामार्ग वाहतूक पोलिसांचे दुर्लक्ष
पुणे-सातारा महामार्गावर सुटीच्या दिवशी वाहनांच्या लांब रांगा लागत आहेत. महामार्ग वाहतूक पोलिस अधिकार्यांचे दुर्लक्ष होत असून, केवळ टोल नाक्यावर कारवाई करण्यात वाहतूक पोलिस मग्न असतात. मात्र, वाहतूक कोंडी झाल्यावर घटनास्थळी फिरकत देखील नसल्याने नाराजी व्यक्त होत आहे.