पुणे

भातपिकास लगडल्या ओंब्या ; पावसाच्या ओढीने शेतकरी चिंतेत

अमृता चौगुले

वाडा : पुढारी वृत्तसेवा : खेड तालुक्याच्या पश्चिम भागातील भातपिके ओंब्यांनी लगडण्यास सुरुवात झाली आहे. मात्र, पिकांना जोरदार पावसाची प्रतीक्षा आहे. दुसरीकडे कडक उन्हामुळे सोयाबीनच्या पिकांनी माना टाकण्यास सुरुवात केली आहे. तर भातखाचरांमधील पाणी सुकण्यास सुरुवात झाली आहे.  तालुक्याच्या पश्चिम भागात मोठ्या प्रमाणावर भाताच्या लागवडी करण्यात आलेल्या आहेत. सध्या पिके जोमदार आहेत. त्यांना ओंब्या लगडण्यास सुरुवात झाल्याने चांगल्या उत्पन्नाची आस शेतकर्‍यांना लागली आहे. चालू वर्षी जून व जुलै महिन्यांच्या पहिल्या आठवड्यापर्यंत पावसाने ओढ दिल्याने खेड तालुक्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली होती. भाताची दुबार लागवड करणे शक्य नसल्याने खरीप हंगाम गेल्यात जमा होता. जुलै महिन्याच्या मध्यावर पावसाने सुरुवात केल्याने पिकांना जीवदान मिळाले.

सध्या भातपिके ओंब्यांनी लगडण्यास सुरुवात झाल्याने त्याचबरोबर सोयाबीनलाही शेंगा लगडण्यास सुरुवात झाली आहे. भुईमुगाची पिके आर्‍या लागण्याच्या अवस्थेत असल्याने या पिकालाही पावसाची गरज आहे. गेल्या काही दिवसांपासून कडक ऊन पडत असून, भातखाचरातील पाणी सुकू लागले आहे. तर सोयाबीनही सुकू लागले असून, जोरदार पावसाची प्रतीक्षा शेतकरी करत आहेत.

हेही वाचा 

SCROLL FOR NEXT