पुणे

आधुनिकतेच्या रेट्यात हरवली मातीची भांडी

अमृता चौगुले

श्रीकांत बोरावके

आळंदी : आधुनिकतेच्या रेट्यात जशी आपली संस्कृती, परंपरा बदलल्या; त्यानुसार स्वयंपाकघरातील भांडीदेखील बदलत गेली. मातीच्या आणि विशेषतः शाडू माती, काळ्या मातीच्या वस्तू लुप्त झाल्या असून, त्याची जागा सिरॅमिक, स्टील, प्लास्टिकच्या भांड्यांनी घेतली आहे. फ्रिज आल्यापासून मातीच्या माठाची मागणी घटली, तर गॅस आल्यापासून चुलीचा वापर कमी झाला. यामुळे आधुनिकतेच्या रेट्यात मातीची भांडी हरवून गेल्याचे चित्र आहे.

सिरॅमिक, प्लास्टिक भांडीदेखील विदेशातून आयात केली जात असल्याने देशी बनावटीची भांडी जवळजवळ नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. काही वर्षांपूर्वी ताक पिण्यासाठी, दही खाण्यासाठी बुरकुळी वापरली जात. त्याची जागादेखील आता प्लास्टिकने घेतल्याचे चित्र आहे. किमतीने स्वस्त असल्याने नागरिक प्लास्टिकच्या भांड्यांचा पर्याय निवडू लागले आहेत. यामुळे मातीची भांडी बनविणारे कारागीर बेरोजगार झाल्याचे चित्र आहे.

गावोगावचे कुंभार आता मातीचे बैल, गणेशमूर्ती, माठ, किल्ल्यावरील चित्रे, लक्ष्मीमूर्तीसह इतर वस्तू बनवताना दिसून येत नाहीत. तशी मागणीदेखील त्यांच्याकडे होत नाही. 'आमच्या अंगणात ना, भले मोठे रांजण आहे,' असे म्हणायचे दिवस आता गेले असून, आता 'आमच्या अंगणात दोन हजार लिटरची प्लास्टिकची टाकी असते,' असे म्हणायची वेळ आली आहे. प्लास्टिक अधिक जवळचे झाल्याने त्याचा मोठा फटका मातीच्या भांड्यांना बसला आहे. परिणामी, कुंभार व्यावसायिकांना शोभेच्या वस्तू घडविण्याची वेळ आली आहे.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT