पुणे

यंदाचा उन्हाळा रानमेव्याशिवाय सुना सुना……

अमृता चौगुले

इंदोरी : पुढारी वृत्तसेवा

रानमेवा पाहिला की आपसूकच जिभेला पाणी सुटणारच.! विलायती चिंच,बोर, करवंदं, तुती, कैरी, आवळा, आबोळी, जाम हा गावाकडचा रानमेवा आता दुर्मीळ होत चालला आहे. वसंत आणि ग्रीष्मातील दाहकतेतही पाहताक्षणी तोंडाला पाणी सुटेल इतका चविष्ट, आंबट गोड, रसाळ रानमेवा… जिभेवर ठेवताच तासन्तास त्या रानमेव्याच्या विशिष्ट चवीची आठवण नेहमी उन्हाळ्यात होतेच होते.

विलायती चिंच, आवळा, बोरे, जाम, निंबोळ्या, तिखट मीठ लावलेली तोतापुरी कैरीची चवही काही न्यारीच… उन्हाळ्यामध्ये जिभेचे चोचले पुरविणारा हा रानमेवा गेल्या काही वर्षांत मावळ परिसरात आता दुर्मिळ झाला आहे. लहान-थोरांना आवडणारा हा रानमेवा आता ठराविक ठिकाणी बहरताना दिसत आहे.

15-20 वर्षांपूर्वी इंदोरी,नानोली तर्फे चाकण ,जांबवडे ,भंडारा डोंगर पायथा आदी या परिसरात मोठया प्रमाणात आंबट-गोड बोर, करवंद, आंबोळी, तुती यांची रेलचेल असायची. सद्य परिस्थित या ठिकाणी रानमेव्यांची झाडांची संख्या कमी होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. बाजारात, चौकात, गल्लोगल्ली व शाळेच्या बाहेर या फळांचे विक्रेते दिसायचे.

लहान मुलांच्या रानमेव्यावर उड्या पडायच्या. अलीकडे गावरान बोरांची जागा नवीन इलायती बोरांनी घेतली आहे. जळगाव, अहमदाबादी बोर बाजारात अधिक दिसतात. गावरान बोराच्या चवीची सर इतर बोरांना नाही. तसेच या रानमेवा वर ताव मारण्यासाठी आता कोणीही जात नाही. रानमेवा तोडण्यासाठी जाणारे तरुण मोबाइल गेम्समध्ये व्यस्त झाले आहेत. रानमेव्यावर ताव मारण्यासाठी जाणारे तरुण व रानमेवा वृक्ष यांची संख्या कमी झाली आहे, अशी खंत मावळ परिसरातील वयोवृद्धांनी व्यक्त केली.

नानोली येथील श्री फिरंगाई देवी डोंगर पायथ्यावर बोर, करवंद , आंबोळी, तुती फळांचा रानमेवा भेटायचा पण स्थानिक लोकांकडून या झाडांची कत्तल होताना दिसून येत आहेत. सध्या थोड्या फार प्रमाणात डोंगराळ भागात या रानमेवा बोरांचा बहर दिसत आहे. कातकरी ठाकर समाजातील महिला खूप त्रासातून डोंगराळ भागात जाऊन या बोरांची काढणी करतात. काटे असल्याने काळजी घ्यावी लागते. कष्टपूर्वक काढलेल्या या बोरांना बाजारात खूप कमी भाव मिळतो.

शहरी भागात जरी मोठी मागणी नसली, तरी ग्रामीण भागातील मुलांना या रानमेव्याव्यतिरिक्त कोणत्याच बोरांची चव आवडत नसल्याचे मुलांनी सांगितले. गावात वाढलेली बांधकामे, डोंगराळ भागातील होणारी कामे, कातकरी ठाकर आदी लोकांकडून होणारी झाडांची कत्तल यामुळे आज बोर, करवंद, आंबोळी, तुती यांसारख्या रानमेव्यांची झाडांची संख्या कमी होत असल्याने याही झाडांचे संवर्धन व्हावे, अशी खंत इंदोरी मावळ वयोवृद्ध ग्रामस्थांनी केली आहे.

करवंदीच्या जाळ्या घटल्या
नाणोली तर्फे चाकण डोंगर परिसरात तसेच भंडारा डोंगर परिसर आदी ठिकाणी बोर, करवंद , आंबोळी, तुती फळांचा रानमेवा मिळायचा; परंतु स्थानिक लोकांकडून या झाडांची कत्तल होताना दिसून येत आहेत. रानमेवा दिवसंदिवस दुर्मिळ होत आहे. खवय्यांना रानमेवा विकत घ्यावे लागत आहेत.
                                      -सुप्रिया लोंढे, नाणोली तर्फे चाकण, स्थानिक रहिवासी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT