जगातील सर्वात जुन्या ममीज इजिप्तमध्ये नव्हे, तर चिलीत | पुढारी

जगातील सर्वात जुन्या ममीज इजिप्तमध्ये नव्हे, तर चिलीत

सँटियागो : एखादा मृतदेह हजारो वर्षे जतन करून ठेवणे हे काम खरोखरच आश्चर्यकारक आहे. याला ममी असे म्हटले जाते. आता ममी म्हटले की, सर्वात पहिल्यांदा डोळ्यांसमोर नाव तरळते ते इजिप्तचे. मात्र, जगात एक असाही देश आहे की, जिथे इजिप्तच्याही आधी अशा ममीज तयार करण्यात आल्या होत्या आणि आजसुद्धा त्या जतन करून ठेवण्यात आल्या आहेत. या देशाचे नाव आहे चिली.

या लॅटिन अमेरिकन देशातील आटाकामा वाळवंटात तब्बल सात हजार वर्षांपूर्वी तयार करून ठेवलेल्या ममीजची शब्दशः माती होत चालली आहे. या भूप्रदेशात तीन फुटांपर्यंत खोदकाम केले तर तिथे हटकून ममी मिळते. प्राचीन काळातील संपन्न मानवी संस्कृतीचे हे अवशेष काळाच्या पडद्याआड चालले असून ते वाचविण्यासाठी प्रयत्न होणे आवश्यक आहे, असे पुरातत्त्व शास्त्रज्ञ मानतात. त्यांच्या मते, इजिप्तमधील सर्वात जुनी ममी सुमारे दोन हजार वर्षांपूर्वीची आहे. मात्र, चिलीतील ममीज सात हजार वर्षांपूर्वीच्या आहेत.

बीबीसीचे ट्रॅव्हलचे प्रतिनिधी जुआन फ्रान्सिस्को रिमालो यांनी या विषयावर विस्तृत लेखन केले आहे. त्यांच्या मते, उत्तर चिलीतील चिंचोरो नामक लोकांचे मृतदेह त्या काळी ममीजच्या स्वरूपात जतन करून ठेवण्यात आले आहेत. हिरवाईचा पूर्णपणे अभाव आणि प्रखर उष्मा यामुळे या ममीज जवळपास नामशेष होत चालल्या आहेत. युनेस्कोन 2021 मध्ये या चिंचोरे ममीजना जागतिक वारसा स्थळांच्या यादीत स्थान दिल्यानंतर पुरातत्त्व शास्त्रज्ञांच्या आशा पल्लवीत झाल्या होत्या. मात्र, या ममीजचे चांगल्या प्रकारे जतन करण्यासाठी कोणतीही ठोस पावले उचलली गेलेली नाहीत.

हेही वाचलंत का?

Back to top button