पुणे

पुणे : विधानसभेला नेते ‘सेफ’; स्थानिकला ‘फुटू द्या कार्यकर्त्यांची डोकी’!

अमृता चौगुले

दिपक देशमुख

यवत : जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका निवडणुकीमध्ये राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडीत बिघाडी होण्याची चिन्हे आता स्पष्टपणे दिसू लागली आहेत. जिल्ह्यात महाविकास आघाडी कायम ठेवायची असेल तर राष्ट्रवादी काँग्रेसला सर्वाधिक त्याग करावा लागणार आहे. त्याला या पक्षाच्या तालुका पातळीवरील नेत्यांची तयारी दिसत नसल्याचे सध्याच्या राजकीय हालचालींवरून दिसत आहे.
विधानसभेला नेतेमंडळी 'सेफ', स्थानिक निवडणुकांत 'फुटू द्या कार्यकर्त्यांची डोकी' हा तोडगा अखेरीला निघण्याची शक्यता आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, शिवसेना या तीनही पक्षांतील तालुका नेत्यांना आपल्या तालुक्यावर वर्चस्व राखायचे आहे. आगामी विधानसभेला नाही उमेदवारी मिळाली तर बंडखोरी किंवा अपक्षसाठी त्यांची तयारी सुरू झाली आहे. विधानसभेला जर निवडणूकपूर्व महाविकास आघाडी झाली तर जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका यशावर उमेदवारीसाठी विद्यमान आमदारांऐवजी आपली दावेदारी बळकट करता येईल, अशी शिवसेनेतील अनेक नेते मंडळींची योजना आहे. तर काँग्रेस पक्ष पुरंदर, भोर-वेल्हा-मुळशीतील आपल्या वर्चस्वाला धक्का लागू न देता जिल्ह्यात इतर तालुक्यात आपली ताकद वाढविण्यासाठी प्रयत्नशील आहे.

आघाडीत सुरू आहे घमासान

शिरूर लोकसभा मतदारसंघात माजी खासदार, शिवसेनेचे उपनेते शिवाजीराव आढळराव-पाटील शिवसेनेची ताकद जराही कमी होऊ देणार नसल्याने त्यांना जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका निवडणुकीत उमेदवारी वाटपासाठी महाविकास आघाडी मोठा अडथळा ठरू शकते. खेड, जुन्नर, शिरूर, हवेली, आंबेगाव या तालुक्यांत तर आताच राष्ट्रवादी आणि शिवसेनेत निरनिराळ्या मुद्द्यांवरून घमासान सुरू आहे.

शिवतारे-जगताप समझोता अशक्य!

पुरंदरमध्ये शिवसेनेचे माजी मंत्री विजय शिवतारे महाविकास आघाडीत तेथील काँग्रेसचे आमदार संजय जगताप यांच्याशी अजिबात समझोता करण्याची शक्यता नाही. आ. जगताप आणि शिवतारे यांनी आताच स्वबळाची तयारी सुरू केली आहे. इंदापूर, बारामती, दौंडमध्ये काँग्रेस आणि शिवसेनेला महाविकास आघाडीत जागा सोडण्यास राष्ट्रवादी काँग्रेस कदापिही तयार होणार नाही. या तालुक्यातच काय तर जिल्ह्यात काेठेही राष्ट्रवादी यासाठी तयार होईल असे वाटत नाही एवढी जिल्ह्यात त्यांची ताकद प्रबळ आहे. महाविकास आघाडी करायचे ठरलेच तर काँग्रेस आणि शिवसेनेला अगदी नगण्य जागा सोडण्याची राष्ट्रवादीची तयारी राहील आणि ते या दोन पक्षांना कदापिही मान्य होणार नाही.

या एकंदरीत राजकीय वातावरणामुळे राष्ट्रवादीचे सर्वोच्च नेते मंडळी पुणे जिल्ह्यातीलच असतानाही निवडणुका अगदी तोंडावर आलेल्या असूनही महाविकास आघाडीची चर्चा होताना दिसत नाही. उलट महाविकास आघाडी राज्यात सत्तेवर आहे आणि आपला पक्ष त्यात आहे हे विसरल्यागत राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि काँग्रसची स्थानिक नेते मंडळी वागत आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT