पुणे : पुढारी वृत्तसेवा : राज्यातील दुष्काळग्रस्त तालुक्यांना केंद्रीय पथक भेट देणार आहे. ते शेतकरी, लोकप्रतिनिधी, अधिकारी आदींशी चर्चा करणार आहे. 13 आणि 14 डिसेंबर रोजी पाहणी करून 15 डिसेंबर रोजी या पथकातील सर्व सदस्यांची पुणे येथे बैठक होणार आहे. ही समिती राज्यातील दुष्काळाचा अहवाल केंद्र शासनाला सादर करणार असल्याची माहिती देण्यात आली. केंद्रीय पथकाचे प्रमुख आणि केंद्र शासनाच्या कृषी विभागाचे सहसचिव प्रियरंजन यांच्या मार्गदर्शनाखाली हे पथक राज्यात आले आहे.
खरीप हंगामातील दुष्काळी परिस्थितीमुळे झालेल्या पीक नुकसानीबाबत विभागीय आयुक्त कार्यालयात राज्यस्तरीय आढावा बैठक मंगळवारी झाली. बैठकीला पुणे विभागीय आयुक्त सौरभ राव, छत्रपती संभाजीनगरचे विभागीय आयुक्त मधुकर अर्दड, कृषी आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, पशुसंवर्धन आयुक्त हेमंत वसेकर, केंद्रीय पथकातील मनोज के., जगदीश साहू, संशोधन अधिकारी शिवचरण मीना, अतिरिक्त सल्लागार ए. मुरलीधरन, पाणीपुरवठा विभागाचे संचालक हरीश उंबरजे, ग्रामीण विकास विभागाचे उपसचिव प्रदीप कुमार आदी बैठकीला उपस्थित होते. जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख आदी उपस्थित होते.
भूजलपातळी चिंताजनक
राज्यातील दुष्काळी भागाचा दौर्यात शेतकरी, पशुपालक, लोकप्रतिनिधी यांची भेट घेतली जाणार आहे. प्रत्यक्ष पीक नुकसानीची पाहणी केली जाईल. दुष्काळाबाबत अधिकची माहिती असल्यास समितीकडे दोन दिवसांत सादर करावी. समितीसमोर झालेले सादरीकरण आणि पाहणी दौर्याच्या आधारे केंद्र शासनास अहवाल सादर करण्यात येईल. दुष्काळग्रस्त भागात पेरणीचे प्रमाण जरी सरासरीएवढे असले तरी पावसाने ओढ दिल्याने उत्पादनावर परिणाम झालेला दिसून येत आहे. विशेष म्हणजे भूजलाची पातळीदेखील चिंताजनक आहे.
-प्रियरंजन, सहसचिव, केंद्रीय कृषी विभाग.
पुणे जिल्ह्यात जून महिन्यात 53 टक्के आणि ऑगस्ट महिन्यात 39 टक्के पाऊस झाला, तर सोलापूर जिल्ह्यात हे प्रमाण अनुक्रमे 28 आणि 19 टक्के होते. दोन्ही जिल्ह्यांत कोरड्या दिवसांचा कालावधी लांबल्याने खरीप हंगामातील पीक वाढीवर परिणाम होण्यासोबत रब्बीचे क्षेत्रही कमी झाले आहे. पुणे जिल्ह्यातील बारामती व पुरंदर या तालुक्यात तीव— तर दौंड, शिरुर तालुक्यात मध्यम स्वरूपाची दुष्काळी परिस्थिती आहे. तर सोलापूर जिल्ह्यातील बार्शी, सांगोला, माळशिरस या तालुक्यात तीव— व माढा आणि करमाळा तालुक्यात मध्यम स्वरूपाची दुष्काळाची स्थिती आहे. पुणे जिल्ह्यातील 156 पैकी 75 आणि सोलापूर जिल्ह्यातील 110 पैकी 100 मंडळात दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे.
– सौरभ राव, पुणे विभागीय आयुक्त, पुणे.
पावसाळ्यात कोरड्या दिवसांची संख्या अधिक असल्याने दुष्काळग्रस्त भागात ज्वारी, बाजरी, मूग, उडीद आणि सूर्यफुलाचे उत्पादन घटले आहे. राज्याच्या 10 जिल्ह्यात 24 तालुक्यांमध्ये तीव— दुष्काळ असून 7 जिल्ह्यातील 16 तालुक्यांमध्ये मध्यम स्वरूपाचा दुष्काळ आहे. रब्बीच्या 53.97 लाख हेक्टरपैकी केवळ 36.37 लाख हेक्टर क्षेत्रावरच पेरणी झाली आहे. दुष्काळी भागातील 24.76 लाख हेक्टर क्षेत्र बाधित
झाले आहे.
– डॉ. प्रवीण गेडाम, कृषी आयुक्त, पुणे.
'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.
Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.