‘इसिस’कडून पडघा-बोरिवली ‘स्वतंत्र’

संग्रहित छायाचित्र.
संग्रहित छायाचित्र.
Published on
Updated on

ठाणे; पुढारी वृत्तसेवा : देशात इस्लामी जिहादला अनुसरून घातपाती कारवाया करत हिंसाचाराचे थैमान घालण्याचा इरादा असलेल्या इसिस या आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटनेच्या ठिकाणांवर ठाण्यासह पुण्यात तब्बल 44 ठिकाणी छापे घातल्यानंतर राष्ट्रीय तपास संस्थेने 15 जणांना अटक केली. या घटनेनंतर तपासातून अत्यंत धक्कादायक माहिती समोर आली आहे. या सर्व जिहादी दहशतवाद्यांनी ठाणे जिल्ह्यातील पडघा-बोरिवली गावाला परस्पर स्वातंत्र्य जाहीर करून त्याचे नामांतर अल् शाम असे केले होते.

शनिवारी मध्यरात्री 'एनआयए'ने ठाणे ग्रामीणच्या दहशतवाद विरोधी पथकांच्या मोठ्या फौजफाट्यासह गावाला वेढा घालत पहाटे ही कारवाई केली. कारवाईच्या केंद्रस्थानी असलेला साकिब नाचन यास ताब्यात घेतल्यानंतर गावात तणावपूर्ण शांतता आहे. इसिस मॉड्यूलचे हँडलर्स हे परदेशातून येथील यंत्रणा हाताळत असल्याचेही तपासात समोर आले. विशेष म्हणजे पडघा बोरिवलीला 'इसिस'ने स्वतंत्र जाहीर करून त्याचे नामांतर अल् शाम धरती बनवण्याचे साकिब नाचनचे स्वप्न होते; पण एनआयने अत्यंत वेगात अचूक धडक कारवाई करून 'इसिस'चे मॉड्यूल उद्ध्वस्त केले. या गावचा पूर्वेतिहास पाहिल्यास खैर लाकडाची तस्करी करणारे तस्कर या गावात मोठ्या प्रमाणावर आहेत. अटक केलेल्या सर्व आरोपींचे कुटुंबीय सधन आहेत. तेथे देशातल्या इतर प्रांतांमधून जिहादी तत्त्वांच्या मुस्लिम युवकांना आणून स्थायिक करून मोठ्या प्रमाणावर दहशतवादाचे प्रशिक्षण देण्याची त्यांची घातक योजना सुरू होती. देशात ठिकठिकाणी अशी स्वतंत्र गावे आणि नंतर राज्य निर्माण करण्याचा त्यांचा इरादा एनआयएच्या तपासातून उघडकीस आला आहे. या अटक कारवाईत मूळचा लाकूड व्यावसायिक तसेच बोरिवली गावचा उपसरपंच फरहान सुसे यालाही ताब्यात घेतले आहे.

तसेच बांधकाम व्यावसायिक सैफ नाचन व रेहान सुसेनाही अटक केली आहे. अटक केलेल्या व्यक्तींच्या घरातून रोकड रक्कम व मोबाईलही जप्त केले आहेत. एनआयएच्या पथकाने या सर्व आरोपींना एका खासगी विमानाने पतियाळा येथे हलवले असल्याचे पोलिस सूत्रांकडून समजते. या सर्व पार्श्वभूमीवर बोरिवली गावात काहींशी बोलण्याचा प्रयत्न केला असता कोणीही या कारवाई संदर्भात बोलण्यास तयार नाही. आजही काही प्रमाणात पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

साकिब नाचन कोण आहे?

2002-2003 मध्ये मुंबईत झालेल्या तीन बॉम्बस्फोटांप्रकरणी साकिब नाचनचे नाव चर्चेत आले. 1990 च्या दशकापासूनच तो तपास यंत्रणांच्या रडारवर होता. त्याच्यावर दहशतवाद आणि खुनाच्या आरोपाखाली किमान 11 खटले चालले आहेत. साधारण 15 वर्षे तो तुरुंगातही जाऊन आला आहे. 63 वर्षांचा साकिब एकेकाळी 'स्टुडंटस् इस्लामिक मूव्हमेंट ऑफ इंडिया' अर्थात सिमी या बंदी घातलेल्या संघटनेचा महाराष्ट्राचा अध्यक्ष होता. 1985 च्या आसपास साकिब नाचन आधी पाकिस्तानात आणि तिथून अफगाणिस्तानात गेला. अफगाण मुजाहिद्दीन लोकांशी संपर्कात असल्याचा आणि त्याने खलिस्तानी दहशतवाद्यांना प्रशिक्षणासाठी मदत केल्याचा आरोप सीबीआयने 1992 साली त्याच्यावर दाखल केलेल्या आरोपपत्रात केला होता.

प्रदीप शर्मा, दया नायक यांना पडघा-बोरिवली गाव भिडलेले

पडघा हे भिवंडीजवळचे नाशिक हायवेवरचे गाव. त्यालगतच असलेल्या सुमारे सात हजार लोकवस्तीच्या बोरिवलीत कोकणी मुस्लिम बहुसंख्य आहेत. येथेच साकिबचे कुटुंब राहते. साकिबला अकरा भावंडे आहेत. घाटकोपरमध्ये पोलिस गोळीबारात दोन पाकिस्तानी आणि एक काश्मिरी मारला गेला होता. हे तिघे दहशतवादी होते. त्यातल्या एकाकडील डायरीत साकिब नाचनने मुंबई हल्ल्यासाठी मदत केल्याचा उल्लेख होता, असा दावा पोलिसांनी केला होता. प्रदीप शर्मा, दया नायक आणि सचिन वाझे हे पोलिस अधिकारी साकिबला अटक करून नेत असताना गावच्या काही तरुणांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. गावातल्या वयस्कर लोकांनी मध्यस्थी केल्याने पोलिसांना तिथून बाहेर पडता आले. पण साकिब त्यांच्या हातून निसटला. पोलिसांनी त्यानंतरच्या काळात गावाची एकप्रकारे नाकाबंदी केली. त्यानंतर साकिब शरण गेला. त्यावेळी पोलिसांनी एकूण 13 जणांना अटक केली होती. त्या प्रकरणात बेकायदा शस्त्रे बाळगल्याप्रकरणी 'पोटा' कायद्याखाली साकिबला दहा वर्षांच्या कारावासाची शिक्षा झाली होती. 2017 मध्ये त्याची सुटका झाली होती.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news