आशिष देशमुख
पुणे: शहरात मे ते ऑगस्ट असा सलग चार महिने चांगला पाऊस झाल्याने हरित छत्र 25 ते 30 टक्क्यांनी वाढले आहे. त्यामुळे जंगलातील पशू, पक्षी आणि इतर प्राण्यांना पाणथळीच्या जागा मुबलक झाल्या तसेच खाद्यही भरपूर उपलब्ध झाले आहे.
शहरातील सर्वच टेकड्या आणि परिसर सलग चार महिन्यांपासून हिरवागार आहे. अशी स्थिती गत पंधरा ते वीस वर्षांनी पाहावसाय मिळत असल्याची भावना ज्येष्ठ नागरिकांनी व्यक्त केली आहे. जंगलातील गवताची उंची चार ते पाच फुटांनी वाढल्याने हिवाळ्यात आगीचे धोके वाढले आहेत. (Latest Pune News)
यंदा शहरात मे महिन्यातच पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे उन्हाळा हा मार्च ते एप्रिल असा दोनच महिने जाणवला. शहरात 17 ते 27 मे या कालावधीत अतिमुसळधार अवकाळी पाऊस झाला. शहरात 270 मिमी पावसाची नोंद झाली. मे महिन्यात सरासरी 60 ते 80 मिमी पाऊस पडतो. मात्र, शहरात अडीचशे ते तीनशे टक्के अधिक पाऊस झाल्याने जमिनीची धूप मे महिन्यात थांबली आणि यंदा चक्क मेमध्ये टेकड्यांवर हिरवळ पाहावयास मिळाली.
मे ते ऑगस्ट चार महिने चांगला पाऊस...
शहरात मेमध्ये 270, जूनमध्ये 260 मिमी पाऊस झाला. फक्त जुलैमध्ये शहरात 145 मिमी इतका कमी पाऊस झाला. शहरात मोठी तूट होती. मात्र, मे-जूनने ही तूट भरून काढली. जुलैमध्ये रिमझिम पाऊस रोजच पडत राहिला. त्यामुळे जमिनीत पाणी मुरत राहिले अन् जंगलातील प्राण्यांना पाणथळीच्या जागेत पाणी वाढतच राहिले. तशीच काहीशी स्थिती ऑगस्ट महिन्यात होती. 15 ऑगस्टपर्यंत फारसा पाऊस नव्हता. मात्र, 18 ते 31 ऑगस्टपर्यंत चांगला पाऊस झाला. सतत भीजपावसाने शहरात कमालीचा गारठा पुणेकरांनी कितीतरी वर्षांनी पावसाळ्यात अनुभवला.
जंगलातील गवताची उंची पाच फुटांवर...
शहरासह संपूर्ण जिल्ह्यात मे महिन्यापासून पाऊस सुरू असल्यामुळे गवताची उंची चार ते पाच फुटांपर्यंत वाढली आहे. त्यामुळे वन अधिकार्यांसमोर हिवाळ्यात नवीन आव्हान उभे राहणार असल्याची भावना अधिकार्यांनी बोलून दाखवली. जेवढे गवत जास्त तेवढा आगीचा धोका जास्त वाढल्याचे अधिकार्यांनी सांगितले.
यंदा सर्वत्र चांगला पाऊस झाल्याने हरित छत्र चांगले वाढले. पशू, पक्षी, प्राण्यांना मुबलक खाद्य अन् पाणी मिळाले. मात्र, आमच्यासमोर जंगलात वाढलेले गवत काढायचे कसे, हे मोठे आव्हान आहे. कारण, गवताची उंची आत्ताच 5 फुटांवर गेली आहे. अजून सप्टेंबर आणि ऑक्टोबरचा पाऊस बाकी आहे. त्यामुळे हिवाळ्यात हे गवत लवकर काढले नाही, तर आगीचे धोके वाढतात.- मनोज बारबोले, वन अधिकारी, भांबुर्डा वनक्षेत्र, पुणे
असा पाऊस आम्ही साधारण 2005 पर्यंत पाहिला आहे. त्यानंतर पाऊस जून, तर कधी ऑगस्टमध्ये ओढ देणे सुरू झाले. त्यामुळे डोंगर बोडखे राहत असत. मात्र, गत वीस-पंचवीस वर्षांनी यंदा प्रथमच शहरात सलग चार महिने भीजपाऊस पाहायला मिळाला. श्रावणात ऊन-पावसाचा खेळ खूप वर्षांनी अनुभवता आला. त्यामुळे यंदाचा पावसाळा हा खरा पावसाळा वाटला.- मनोज पाटील, ज्येष्ठ नागरिक, कोथरूड