पुणे: वारंवार कारवाई करूनही अवैध हातभट्टी दारू विक्रीचा बेकायदेशीर व्यवसाय न सोडणाऱ्या विक्रेत्यावर अखेर उत्पादन शुल्क विभागाने (एक्साईज) ‘एमपीडीए’ कायद्याअंतर्गत स्थानबद्धतेची कारवाई केली.
राहुल व्यंकट राठोड (वय 30, रा. काळेशिवार शिंदवणे, ता. हवेली) असे स्थानबद्ध केलेल्याचे नाव असून, थेट त्याची रवानगी मुंबईतील ऑर्थर रोड कारागृहात करण्यात आली आहे. दरम्यान, या कारवाईमुळे जिल्ह्यातील हातभट्टी दारू बनविणाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
राठोड याच्यावर यापूर्वीही महाराष्ट्र दारूबंदी कायदा 1949 अंतर्गत 4 गुन्हे दाखल झाले होते. त्याच्या सततच्या बेकायदेशीर कारवायांमुळे त्याच्याकडून एका लाख रुपये किमतीचे चांगल्या वर्तनाचे बंधपत्र घेतले होते. मात्र, ते असूनही राठोड याने आपली कृत्ये न थांबवता धोकादायक रसायनांचा वापर करून हातभट्टी दारू तयार करणे आणि विक्री करणे सुरू ठेवले. पुन्हा पुन्हा होत असलेल्या गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक अतुल कानडे यांच्या मार्गदर्शनाखाली भरारी पथकाच्या निरीक्षकांनी राठोड याच्यावर एमपीडीए कारवाईचा प्रस्ताव तयार केला. हा प्रस्ताव तपासून जिल्हाधिकाऱ्यांनी त्यास मंजुरी दिली.
त्यानुसार राठोडला थेट ऑर्थर रोड कारागृह, मुंबईत स्थानबद्ध केले आहे. अधीक्षक अतुल कानडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधीक्षक उत्तम शिंदे, दुय्यम निरीक्षक किरण पाटील, प्रियंका कारंडे, शंकर हाके, रोहित माने, स्वप्निल कदम यांच्यासह पथकाने ही कारवाई केली.
अवैध मद्यनिर्मिती, वाहतूक आणि विक्री करणाऱ्या विरुद्ध राज्य उत्पादन शुल्क विभागाने कारवाईसाठी भरारी पथकाची नेमणूक केली आहे, त्यानुसार ही कारवाई सुरू आहे. असे सतत गुन्हे करणाऱ्यांवर विभागाकडून स्थानबद्धतेचीसुद्धा कारवाई करण्यात येत आहे. नागरिकांना आवाहन आहे, त्यांनी देखील आपल्या परिसरात अवैध मद्यनिर्मिती करून विक्री करणाऱ्यांची माहिती द्यावी.अतुल कानडे, राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक, पुणे