पुणे

SRPF Exam : एसआरपीएफच्या लेखी परीक्षेतील डमीला ठोकल्या बेड्या

अनुराधा कोरवी

पुणे; पुढारी वृत्तसेवा : राज्य राखीव पोलीस दलाच्या (एसआरपीएफ, SRPF Exam ) पोलिस भरतीच्या लेखी परीक्षेत डमी बसलेल्या एकाला इलेक्ट्रानिक गॅझेटसह हडपसर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

विशाल गबरूसिंग बहुरे (रा. जोडवाडी, औरंगाबाद) असे अटक करण्यात आलेल्या युवकाचे नाव आहे. हा प्रकार रविवारी (दि.१३) रोजी दुपारी उघडकीस आला.

गुन्हे निरीक्षक दिगंबर शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी एसआरपीएफ (SRPF Exam ) पोलिस भरतीची लेखी परीक्षा होती. हडपसर पोलिस ठाण्याच्या हद्दीत एस. एम. जोशी कॉलेज येथे ४८० विद्यार्थ्यांची परीक्षा घेण्यात येत होती. परीक्षेत अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिस बंदोबस्त लावण्यात आला होता. महाविद्यालयाशी तशा पद्धतीने व्यवहार देखील केला होता.

याच दरम्यान दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास परीक्षा सुरू असताना परिवेक्षक अनुप पवार यांना एक मुलगा काही तरी बडबडत असल्याचा संशय आला. त्याचे आधारकार्ड आणि पॅनकार्ड तपासले असताना परिवेक्षकाला त्याला जन्म तारीख, पत्ता व्यवस्थित सांगता आला नसल्याने त्यांचा संशय आणखी बळावला. यानंतर त्यांनी केंद्राध्यक्ष व उपकेंद्रक्षाला बोलवून परीक्षार्थीची खात्री केली.

त्यावेळी त्यांना परीक्षेस बसलेला मुलगा प्रवेश पत्रावर उल्लेख व फोटो असलेला विद्यार्थी नसून दुसराच कोणी असल्याचे समजले. त्यानंतर त्यांच्याकडे चौकशी केली असता सर्व प्रकार उघडकीस आला. पोलिस उपायुक्त नम्रता पाटील, वरिष्ठ पोलिस निरीक्षक अरविंद गोकुळे, गुन्हे निरीक्षक दिगंबर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक सोमनाथ पडसळकर पुढील तपास करीत आहेत.

कानात मुरमुर्‍याच्या आकाराचा डिवाईस

सर्व प्रकारानंतर हडपसर पोलिसांनी संबंधित परीक्षार्थीकडे चौकशी केली असता त्याच्या कानात मुरमुर्‍याच्या आकारासारखा डिवाईस होता. तर हाताला मनगटाजवळ दुसरा डिवाईस होता. या डिवाईसच्या माध्यमातून तो समोरच्या व्यक्तीबरोबर बोलत होता. तसेच प्रश्नपत्रिकेतील प्रश्नांची उत्तरे घेत होता. त्याला डिवाईसच्या माध्यमातून उत्तरे सांगत असल्याचे तपासात निष्पन्न झाले.

भावासाठीच बसला डमी

त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने त्याचे नाव विशाल असल्याचे सांगितले. तसेच तो त्याचा भाऊ भरत याचा डमी म्हणून परीक्षा देत असल्याचे समजले. त्याच्याजवळील कागदपत्रे, इलेक्ट्रॉनिक डिवाईस यावेळी पोलिसांनी जप्त केले. त्याच्यावर बोगस विद्यार्थी म्हणून परीक्षेस बसल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचलंत का? 

SCROLL FOR NEXT