पुण्यात ह्युंदाई करणार आणखी 4 हजार कोटींची गुंतवणूक; एकूण गुंतवणूक जाणार 11 हजार कोटींवर Pudhari
पुणे

Hyundai Pune Investment: पुण्यात ह्युंदाई करणार आणखी 4 हजार कोटींची गुंतवणूक; एकूण गुंतवणूक जाणार 11 हजार कोटींवर

कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक उन्सू किम यांची घोषणा

पुढारी वृत्तसेवा

पुणे: ह्युंदाई मोटार इंडिया लिमिटेड कंपनीने तळेगावमध्ये मोटारनिर्मिती प्रकल्प उभारण्यासाठीची गुंतवणूक सात हजार कोटी रुपयांवरून 11 हजार कोटी रुपयांवर नेली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत नुकत्याच झालेल्या बैठकीनंतर कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक उन्सू किम यांनी गुंतवणूक चार हजार कोटी रुपयांनी वाढवण्याची घोषणा केली. या प्रकल्पाच्या माध्यमातून 7 हजार 600 प्रत्यक्ष रोजगार निर्माण होणार आहेत.

ह्युंदाई कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक किम यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची 15 सप्टेंबरला भेट घेतली. मुख्यमंत्र्यांनी कंपनीच्या शिष्टमंडळासोबत वर्षा निवासस्थानी बैठकही घेतली. या बैठकीत फडणवीस यांनी कंपनीने राज्यातील गुंतवणूक वाढवून रोजगारनिर्मितीत वाढ करावी, असे आवाहन केले होते.  (Latest Pune News)

कंपनी राज्यात सामाजिक उत्तरदायित्वा अंतर्गत (सीएसआर) विविध कामांसाठी 56 कोटी रुपयांचा निधी देते. या निधीतून राज्यात सुरू असलेली कामे इतरांसाठी दिशादर्शक ठरतील, असे गौरवोद्गारही त्यांनी काढले होते.

मुख्यमंत्र्यांनी आवाहन केल्यानंतर ह्युंदाईचे व्यवस्थापकीय संचालक उन्सू किम यांनी तळेगाव प्रकल्पातील गुंतवणूक सात हजार कोटींवरून 11 हजार कोटी रुपयांवर नेली आहे. यामुळे कंपनीची उत्पादनक्षमता मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून 7 हजार 600 प्रत्यक्ष रोजगार निर्माण होतील. याचबरोबर अप्रत्यक्ष रोजगाराच्या मोठ्या संधी उपलब्ध होणार आहेत. यातून या परिसरातील औद्योगिक विकासाला चालना मिळेल.

तळेगाव प्रकल्पातील वाढीव गुंतवणुकीचा वापर अत्याधुनिक निर्मिती तंत्रज्ञान, सेव्हन्थ जनरेशन पेंट शॉप, ऑटोमेशन टूल्स, पायाभूत सुविधा अद्ययावत करणे आणि ई-वाहननिर्मितीसाठी सज्जता वाढविण्यासाठी होणार आहे. या प्रकल्पातून देशांतर्गत, तसेच आंतरराष्ट्रीय बाजारपेठेसाठीही मोटारींची निर्मिती केली जाणार असल्याची माहिती ह्युंदाई मोटर इंडिया लिमिटेडच्या प्रवक्त्यांनी दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT