Hydroponic Ganja Case Pune Pudhari
पुणे

Hydroponic Ganja Case Pune: फ्लॅटमध्ये हायड्रोपोनिक गांजाची शेती; पुणे पोलिसांचा मोठा पर्दाफाश

पुणे–मुंबई–पिंपरी–गोवा कारवाईत साडेतीन कोटींचे अमली पदार्थ जप्त, पाच अटकेत

पुढारी वृत्तसेवा

पुणे : पिंपरी भागात एका फ्लॅटवर छापा टाकून तेथून हायड्रोपोनिक गांजा जप्त करण्यात आला. सदनिकेत हायड्रोपोनिक गांजाची शेती करण्यात आल्याचा धक्‍कादायक प्रकार या कारवाईदरम्‍यान उघडकीस आला आहे.

या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून मिळालेल्या माहितीनंतर पुणे पोलिसांच्या पथकाने पुणे, पिंपरीसह मुंबई, गोव्यात कारवाई केली. या कारवाईत पोलिसांनी मेफेड्रोन, ओझीकुश (हायड्रोपोनिक गांजा), चरस, एलएसडीसह वेगवेगळ्या प्रकारचे अमली पदार्थ जप्त केले. जप्त केलेल्या अमली पदार्थांची किंमत साडेतीन कोटी रुपये आहे.

तुषार चेतन वर्मा (वय २१, सध्या रा. शितळादेवीनगर, सूस, मूळ रा. दिल्ली), सुमीत संतोष डेडवाल (वय २५, सध्या रा. मधुबन काॅलनी, सांगवी, मूळ रा. शिक्षक काॅलनी, गंगापूर, छत्रपती संभाजीनगर), अक्षय सुखलाल महेर (वय २५, सध्या रा. एक्सर्बिया टाऊनशिप, हिंजवडी, मूळ रा. प्रगती काॅलनी, गंगापूर, छत्रपती संभाजीनगर), मलय राजेश डेलीवाला (वय २८, रा. अमृतनगर, घाटकोपर, मुंबई), स्वराज अनंत भोसले (वय २८, रा. खोत चाळ, कुर्ला, मुंबई) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपींच्या खात्यातील सात लाख ८० हजार रुपयांची रक्कम गोठविण्यात आली आहे. आरोपींना पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. अमली पदार्थ तस्करीचे आंतराष्ट्रीय जाळे असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

आरोपी तुषार वर्मा अमली पदार्थ विक्री करत असल्याची माहिती तपास पथकाला मिळाली हाेती. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने खडकी परिसरात सापळा रचून त्याला पकडले. वर्माची चौकशी करण्यात आली. तेव्हा त्याचे साथीदार सुमीत डेडवाल, अक्षय महेर हे पिंपरी भागात वास्तव्यास असून, तेथे त्यांनी सदनिका भाडेतत्त्वावर घेतल्याची माहिती तपासात मिळाली. वर्मा, डेडवाल, महेर यांनी सदनिकेत हायड्रोपोनिक गांजाची लागवड केल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिस उपायुक्त सोमय मुंडे यांच्या मार्गदर्शानाखाली पोलिसांच्या पथकाने पिंपरीत छापा टाकला. तेथून हायड्रापोनिक गांजा, तसेच अन्य साहित्य जप्त केले.

अमली पदार्थ विक्री, तस्करी प्रकरणात वर्मा, डेडवाल, महेर यांची चौकशी करण्यात आली. तेव्हा या प्रकरणातील मुख्य तस्कर मलय डेलीवाला याची माहिती मिळाली. पोलिसांच्या पथकाने डेलीवाला, भोसले यांना मुंबईतून ताब्यात घेतले. तपासात मिळालेल्या माहितीनंतर पोलिसांनी गोव्यात छापे टाकले. या कारवाईत पोलिसांनी तीन कोटी ४५ लाख रुपयांचे अमली पदार्थ जप्त केले. पोलिस आयुक्त अमितेश कुमार, सहआयुक्त रंजनकुमार शर्मा, उपायुक्त सोमय मुंडे, सहायक आयुक्त विठ्ठल दबडे, खडकी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विक्रमसिंह कदम, गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किरण गायकवाड, पोलिस उपनिरीक्षक दिग्विजय चौगले, बाणेर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक चंद्रशेखर सावंत, पोलिस कर्मचारी भोरे, अमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलिस निरीक्षक सुदर्शन गायकवाड, पोलिस निरीक्षक प्रशांत अन्नछत्रे, खंडणी विरोधी पथकाच्या पोलिस निरीक्षक वर्षा देशमुख, सहायक पोलिस निरीक्षक नितीनकुमार नाईक, जाधव, दिनेश भारकड, पोलिस उपनिरीक्षक वैभव पाटील, विराज शिंदे (सहारा पोलिस ठाणे, मुंबई) यांनी ही कारवाई केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT