पुणे

एमसीएच्या अवैध काराभाराविरुद्ध जनआंदोलन उभारणार : वाल्हेकर

अमृता चौगुले
  • 20 डिसेंबरपासून आमरण उपोषणाचा इशारा

पुणे : पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्र क्रिकेट संघटने (एमसीए) च्या पदाधिकार्‍यांचा अवैध कारभार पुन्हा एकदा समोर आला असून, त्याविरोधात माजी क्रिकेटपटू एकत्र आले आहेत. या कारभाराविरुध्द माजी रणजीपटू अनिल वाल्हेकर यांनी जनआंदोलन आणि आमरण उपोषण करण्याचा इशारा पत्रकार परिषदेत दिला आहे. यावेळी माजी रणजीपटू शंतनु सुगवेकर, माधव रानडे, रोहित थोरवे, दादा शेवाळे आदी मान्यवर उपस्थित होते.

वाल्हेकर म्हणाले की, महाराष्ट्र क्रिकेट संघटनेची कार्यकारिणी मुळात चुकीची असून, ती बीसीसीआयच्या मार्गदर्शक तत्वांविरोधात काम करत आहे. बीसीसीआयच्या सर्वोच्च न्यायालयाने नियुक्त केलेल्या समितीने त्यांची 2019 ते 2022 या कालावधीसाठी झालेली निवडणूक यापूर्वीच रद्दबातल ठरवली आहे. त्यामुळे बीसीसीआयने महाराष्ट्र क्रिकेट संघटनेचा मताधिकारही काढून घेतला आहे. यानंतर महाराष्ट्र क्रिकेट संघटनेचे पदाधिकारी चेंज रिपोर्ट बदलून, निवडणूक घटनेनुसार असल्याचे सिद्ध करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.

चांगल्या क्लबना चुकीची वागणूक

दरम्यान, महाराष्ट्र क्रिकेट संघटना आपली निवडणूक खरी असल्याचे दामटून सांगत असून, त्यासाठी ते क्लब ऑफ महाराष्ट्र, पूना क्लब आणि जळगाव जिल्हा क्रिकेट संघटना यांना जाणून बुजून बाजूला ठेवत आहे. चांगल्या पद्धतीने काम करणार्‍या या क्लबचे कामकाज कसे बंद पाडता येईल, याचकडे त्यांचा कल होता. मात्र, धर्मादाय आयुक्तांसमोर झालेल्या युक्तिवादात त्यांचे सर्व युक्तिवाद रद्द ठरवण्यात आले. क्लब ऑफ महाराष्ट्र, पूना क्लब आणि जळगाव या तिन्ही सदस्यांचे अर्ज मान्य करून त्यांना निवडणूक प्रक्रियेविषयी आपले मत लेखी स्वरुपात मांडण्याचे आदेश दिले असल्याचे वाल्हेकर यांनी सांगितले.

महाराष्ट्र क्रिकेट संघटनेत अनेक पदाधिकाऱ्यांना काम करण्याचा अधिकारही नाही. निवडणूकीच्या मार्गदर्शक तत्वांनुसार 9 वर्षे पूर्ण झालेल्या व्यक्तींना संघटनेत पदाधिकारी बनवले गेले आहे. सर्वोच्च न्यायलय, उच्च न्यायालय, धर्मादायआयुक्त अशा सर्वच न्यायसंस्थांचा त्यांनी अपमान केला असून, सामन्यांच्या नियोजनातील भ्रष्टाचार, जाहीर केलेला आणि जाहीर न झालेला आर्थिक ताळेबंद, अशा विविध अवैध कारभाराविषयी पोलिसांत तक्रार करणार आहोत. एमसीएच्या पदाधिकार्‍यांनी 19 तारखेपर्यंत सर्व खरी माहिती सादर करावी, अन्यथा 20 डिसेंबरपासून नेहरु स्टेडियम येथे आमरण उपोषणाला बसणार असल्याचे वाल्हेकर यांनी सांगितले.

भारत-इंग्लंड सामन्यासाठी चुकीचे टेंडर

मार्च 2021 मध्ये इंग्लंड भारत दौर्‍यावर असताना 23, 26 आणि 28 मार्च रोजी जे क्रिकेटचे सामने झाले. त्यासाठी मागविण्यात आलेल्या टेंडरमध्ये घोटाळा करण्यात आलेला आहे. या तीन सामन्यांसाठी मारक्यु कपंनीने 3 लाखांचे टेंडर भरलेले असतानाही, व्हाईट कॉपर नावाच्या कंपनीला तब्बल 21 लाख 50 हजार रुपयांना टेंडर देऊन कंपनीला पैसेही दिलेले आहेत. कमी रकमेचे टेंडर असतानाही संबंधित कंपनीवर पैसे उधळण्याचा प्रताप एमसीएच्या पदाधिकार्‍यांनी केला असल्याचा आरोपही वाल्हेकर यांनी यावेळी केला. दरम्यान, याबाबत व्हाईट कॉपर कंपनीशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता होऊ शकला नाही.

अद्यापही न्यायालयीन प्रक्रिया सुरु

''एमसीएच्या सर्व घटना आणि निवडणुकीसंदर्भात न्यायालयीन प्रक्रिया सुरु आहेत. त्यामुळे त्याबाबत अधिक काही बोलता येणार नाही. त्याचबरोबर भारत-इंग्लंड सामन्याच्या टेंडरबाबत एमसीएची एक स्वतंत्र कमिटी असून, त्यांनी अंतिम केलेली आहे. ही सर्व प्रक्रिया कायद्याच्या चौकटीत राहुनच व्यवहार पुर्ण केलेले आहेत.''

                                                                                             – विकास काकतकर (अध्यक्ष, महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन)

हेही वाचा

SCROLL FOR NEXT